ठाण्याचे ८४ वे साहित्य संमेलन...

मागच्या आठवड्यात ठाण्यात ८४ वे साहित्य संमेलन चालू होते. साहित्य संमेलन ला जायचा योग पहिल्यांदाच आला. पुस्तकावर प्रेम असून आणि वाचायची आवड असून सुद्धा ८४ वे साहित्य संमेलन ला जायचा योग आला. ते सुद्धा सोसायाटी मधल्या एका काकूंना खाडीलकरांचे एक पुस्तक हवे होते म्हणून. दुसऱ्या दिवशी गेलो तर खुप गर्दी होती आणि गाडी पार्किंग ला सुद्धा जागा नव्हती म्हणून परत आलो. तिसऱ्या दिवशी अचानक ऑफिस ला सुट्टी मारली आणि संमेलनाला जायचा योग आला. कदाचित ते नशिबी होते म्हणूनच आज ऑफिसला दांडी झाली असावी.

आतापर्यंत वादामुळे नेहमीच चर्चेत असलेले साहित्य संमेलन ह्या वेळेला सुद्धा वादात होते. एक तर संभाजी ब्रिगेडने स्टेडियमच्या नावावरून वाद झाला. संभाजी ब्रिगेड काय सिद्ध करू इच्छिते आहे काय माहित? दादोजी कोंडदेव महाराजांचे गुरु नव्हते. हे कागदीपत्री सिद्ध करा पुरावे दाखवा आणि मग इतिहास बदला. त्या साठी आधीच घिसाडघाई करून संमेलन कशाला उधळायचे. हे साहित्य संमेलन आहे ज्यात आपल्या लेखकांचा, त्याच्या कवितांचा, लेखांचा, कादंबरीचा गौरव करायचा आहे. आजच्या पिढीला वाचनाकडे आणायचं आहे. त्यांना पुस्तके घेण्यास प्रवृत्त करायचे आहे का त्यांना संमेलन उधळून लावायच्या भीतीने पळवून लावायचे आहे. स्टेडियम चे नाव क्रित्येक वर्षापासून दादोजी कोंडदेव स्टेडियम आहे अचानक एका रात्रीत त्यांना जाग आली आणि स्टेडियमचे नाव बदलण्याची इच्छा झाली ते सुद्धा साहित्य संमेलन तोंडावर असताना. संभाजी ब्रिगेड चा मुख्य राग बहुतेक ब्राह्मण समाजावर आहे असे त्यांच्या एकंदर जाहिराती आणि भाषणावरून वाटते आणि त्यासाठी ते साम दाम दंड आणि भेद वापरायलाहि तयार आहेत. त्यांच्यात आणि इतरांत फरकच तो काय उरतोय? नशीब शिवसेनेने दंड थोपटले आणि त्यांच्याविरुद्ध उभे ठाकले. त्यामुळे निदान साहित्य संमेलन तरी सुखरूप पार पडले.

त्याचे सावट दूर व्हायच्या आधीच अजून एक उभे राहिले ते म्हणजे संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसे चे नाव टाकले. ते ठाण्यातल्या एका राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला आवडले नाही म्हणून त्यांनी हैदोस घातला. त्यांचा तो राग नक्की नथुराम वर होता कि मंडपाचे टेंडर नाही मिळाला म्हणून होता काय माहित? आजच सामना मधील संपादकीय लेख वाचला त्यात नथुरामने आपल्या सफाई मध्ये कोर्टापुढे जे वक्तव्य केले होते ते वाचण्यासारखे होते. त्या लेखातील तो भाग जसाच्या तसा इथे देत आहे.

‘‘मला चांगल्याप्रकारे जाणणार्‍यांना माहीत आहे की मी शांत प्रकृतीचा माणूस आहे; परंतु आम्ही जिला आपली परम आराध्य देवता मानतो अशा आमच्या मातृभूमीची कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी फाळणी केली आणि गांधीजींनी त्याला संमती दिली. तेव्हा माझ्या मनात भयंकर संताप दाटून आला. थोडक्यात सांगायचे तर मी गांधीजींना ठार मारले तर माझा सर्वनाश होईल आणि लोक माझा भयंकर तिरस्कारच करतील. माझी माझ्या प्राणाहूनही जास्त मोलाची अशी प्रतिष्ठा धुळीस मिळवतील हे सर्व मला आधीच दिसत होते. मी विचार केला तेव्हा या सर्व गोष्टी स्पष्टच दिसल्या; परंतु त्याचबरोबर मला असेही वाटते की, गांधीजींवाचून भारतीय राजकारण नक्कीच व्यावहारिक बनेल. ते जशास तसा प्रतिकार करण्यास समर्थ होईल आणि सशस्त्र सेनादलांनी सुसज्ज राहील. व्यक्तिश: माझा सर्वनाश नक्कीच होईल; परंतु पाकिस्तानच्या धाडींना नक्कीच पायबंद बसेल. मला लोक माथेफिरू किंवा मूर्ख म्हणतील; परंतु राष्ट्र तर्कसंगत मार्गक्रमण करायला मोकळे राहील आणि निकोप राष्ट्रनिर्मितीसाठी हीच गोष्ट अत्यंत आवश्यक आहे असे मला वाटत होते. या प्रश्‍नाचा सर्व साधकबाधक अंगानी पूर्ण विचार केल्यावर मी अंतिम निर्णय घेतला. सारे धैर्य एकवटून मी ३० जानेवारी १९४८ रोजी बिर्ला हाऊसमधील प्रार्थना मैदानावर गांधीजींवर गोळ्या झाडल्या...’’

असो राजकारणाचा भाग सोडला तर बाकी साहित्य संमेलन खूप छान होते. ठाण्याच्या नगरीमध्ये होते म्हणून तर अजून छान वाटले. कडकडीत पोलीस बंदोबस्त होता. जवळपास २३० च्या वर प्रकाशक आणि विक्रेते ह्यांची दुकाने लागली होते. वर्तमानपात्रच्या आकड्यावरून जवळपास दोन कोटीच्या वर पुस्तके विकली गेली. मृत्युंजय, छावा, ययाती सारखी गाजलेली पुस्तके खूप कमी किंमतीत विकली जात होती. मीही काही चित्रकलेची पुस्तके विकत घेतली. अगदी दूर दूरच्या शहरातून माणसे पुस्तके विकत घ्यायला आली होती. ठाण्याच्या अनेक वस्तू, तलाव, रस्ते, ऐतिहासिक वाडे ह्यांचे एक छोटेखानी प्रदर्शन हि होते. जवळपास पूर्ण ठाणे त्या फोटो प्रदर्शनात समाविष्ट केले होते.

नक्कीच एक आयुष्यभरासाठी चांगला अनुभव होता.




Read More

फ्री फोटोशेरिंग साईट व त्यांचे फायदे, तोटे


डिजिटल कॅमेरा आल्यापासून फोटोग्राफी क्षेत्रात तर एक नवीन क्रांतीच आली. काही वर्षापूर्वी कॅमेरा म्हणजे एक चैनीची गोष्ट होती. कॅमेरा चा खर्च, कॅमेरा रोल चा खर्च, फोटो प्रिंट करायचा खर्च, अल्बम चा खर्च, त्यात फोटो चांगलाच येईल ह्याची शक्यताच कमी. परत ते फोटो जर आपल्याला शेअर करायचे असेल तर काही शक्यताच नाही. फोटो जर इंटरनेट वर टाकायचे असतील तर चांगल्या प्रतीचा स्कॅनर लागायचा. पण डिजिटल फोटोग्राफी आली फोटोग्राफी मध्ये क्रांतीच आली. अनेक डिजिटल कॅमेरा आले, स्वस्त झाले, मोबाईल आले. मोबाईल मध्ये कॅमेरा आला आणि प्रत्येक जन फोटोग्राफर झाला. फोटो काढल्यावर लगेचच परिणाम दिसू लागले. आवडला तर ठेवायचा नाही तर डिलीट करून नवीन काढायचा.

डिजिटल फोटोग्राफी आली त्याबरोबर डिजिटल फोटो आणि डिजिटल इमेजेस पण आले. ते आपल्या संगणकमध्ये जमा करून ठेवावे लागत. ते आपल्या मित्रांबरोबर शेअर करण्यासाठी अनेक सोशल नेटवर्किंग च्या साईट आल्या व काही फक्त फोटो शेअरिंग च्या साईट आल्या. ह्या साईट आपले फोटो त्यांच्या सर्वर वर अपलोड करून ठेवायला जागा देतात. फोटो साठी जागेव्यतिरिक्त ते फोटो एडिटिंग, शेरिंग सारख्या अनेक सेवा सुद्धा पुरवतात. ब्लॉग लिहायला सुरुवात केल्यावर ह्या फुकट सेवा देणाऱ्या साईट चा शोध चालू झाला आणि काही चांगल्या वाईट साईट भेटल्या अशाच काही साईट बद्दल माहिती, ह्या साईट चे फायदे, तोटे इथे द्यायचा प्रयत्न केला आहे.


पिकासा हे फोटो एडिटिंग चे एक सॉफ्टवेअर पण आहे. ते ह्या लिंक वर डाउनलोड करता येईल. हे एडीट केलेले फोटो आपण पिकासा वेब अल्बम वर अपलोड करू शकतो. ह्यासाठी इथे क्लीक करा. काही वर्षापूर्वी गुगल ने विकत घेतल्यावर हि साईट खुपच चांगली झाली. जाहिराती रहित हि वेबसाईट ऑपरेट करायला खुपच सोपी आहे. ह्या साईट बद्दलची काही वैशिष्ट्ये
  • ओढा आणि सोडा (drag and drop) तत्वावर असेलेली हि साईट वापर करायला खूप सोपी आहे. नेट वापरायला नुकतेच शिकलेल्या लोकांना हि साईट खूपच चांगली आहे.
  • ह्या साईट वर फ्री मध्ये रजिस्टर करू शकता.
  • हि साईट १ जीबी ची जागा फुकट मध्ये देते. त्याहून जास्त हवी असल्यास पैसे भरून घेता येते.
  • ह्या साईट वरून तुम्ही दुसऱ्यांनी अपलोड केलेले फोटो बघू आणि कमेंट करू शकता.
  • नुकतेच त्यांनी व्हिडीओ अपलोडिंग ची सेवा पुरवणे चालू केले आहे.पण YouTube च चांगले.
  • जर तुमच्या कडे गुगल चे लॉगिन असेल तर तुम्ही तेच वापरून इथे लॉगीन करू शकता. जर तुम्ही Blogger वर ब्लॉग लिहीत असला तर तुमचे सर्व पोस्ट केलेले फोटो आपोआप पिकासा मध्ये जमा होत असतात.
  • ह्या साईट वर ऑनलाईन फोटो एडिटिंग करता येत नाही.
  • तुम्ही तुमचे अपलोड केलेले फोटो मूळ साईज मध्ये डाउनलोड करू शकता. हि सेवा खूप कमी साईट पुरवतात.


गुगलच्या पिकासा ची मुख्य स्पर्धक Flickr. याहू चे पाठबळ हिला लाभले आहे. आजच्या घडीला सर्वात जास्त वापरली जाणारी, बघितली जाणारी आणि कमेंट केली जाणारी वेबसाईट.ह्या साईट बद्दलची काही वैशिष्ट्ये
  • पिकासा प्रमाणे ओढा आणि सोडा (drag and drop) तत्वावर असेलेली हि साईट वापर करायला खूप सोपी आहे.
  • ह्या साईट वर ऑनलाईन फोटो एडिटिंग उपलब्ध आहे.
  • पिकासा प्रमाणे इथे पण तुम्ही अल्बम बनवून शेअर करू शकता.
  • फ्लिकर तुम्हाला १०० एमबी पर्यन्त फोटो एका कॅलेंडर महिन्यात अपलोड करायला देते. हे थोडे त्रासदायकच आहे जर तुम्हाला जास्त फोटो अपलोड करायचे असतील तर.
  • फक्त शेवटचे २०० फोटो तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वर दिसतात.
  • आपण अपलोड केलेले फोटो फ्लिकर छोट्या साईज मध्ये परावर्तीत करते. त्यामुळे जर तुम्हाला कधी तुमचा ओरीजिनल साईज आणि मेगा पिक्सल चा फोटो पाहिजे असेल तर परत मिळू शकत नाही. हा ह्या साईट चा खूप मोठा तोटा आहे.
  • ह्या साईट वर तुम्ही तुमचे याहू चे लॉगीन वापरू शकता.


वापरायला सोपी असलेली हि साईट चांगली आहे पण तेवढेच तिचे तोटे हि आहेत.
  • अमर्यादित साठवण्याची जागा. ओनलाईन फोटो एडिटिंग उपलब्ध आहे.
  • पण एखादा सिंगल फोटो शेरिंग जरा किचकट आहे. तुम्हाला युसर्ज चे फोटोचे अल्बम बघायला मिळतील पण एखाद्या सिंगल फोटो वर कमेंट करता येत नाही. पूर्ण अल्बम वर कमेंट करू शकतो.
  • जरी फोटो साठवण्याची जागा अमर्यादित असली तरी हे फोटो सर्वर वर सेव्ह करताना साईज कमी करून जमा केले जातात त्यामुळे ओरिजिनल फोटो परत मिळत नाही.
  • दुसऱ्या ब्लॉग किवा वेबसाईट वरून ह्या फोटोची लिंक योग्य रीतीने देता येत नाही. त्यामुळे हि साईट फक्त फोटो अपलोड करायच्याच कामाची आहे.
  • ह्या साईट वर तुम्ही स्वत:चे फोटो बुक, अल्बम, ग्रीटिंग कार्ड, कॅलेंडर बनवू शकता आणि ओनलाईन मागणी पण करू शकता. अर्थात पैसे भरून.
  • सदस्यत्व घेतल्यावर ४ x ६ चे ५० फोटो प्रिंट करून मागवू शकता.

जवळपास फ्लिकर सारखेच वैशिष्ट्य असलेली हि वेबसाईट आहे.
  • ओढा आणि सोडा (drag and drop) तत्वावर असेलेली वापरायली सोपी वेबसाईट.
  • इतर सदस्याचे फोटो पाहून कमेंट करू शकता.
  • तुमच्या ब्लॉग किवा वेबसाईट वर लिंक हि चांगल्या पद्धतीने करू शकता.
  • प्रत्येक फोटो च्या बाजूला येणाऱ्या साईज च्या बटणावर क्लीक करून तुम्ही साईज लहान मोठी करू शकता. ह्या साईज प्रमाणे तुम्हाला नवीन एचटीएमएल कोड मिळवता येतो.
  • स्टोरेज सेवा हि चांगली आहे. पहिले लॉगीन केल्यावर तुम्हाला १००० फोटो साठी जागा मिळते आणि ती दर महिन्याला १०० फोटो प्रमाणे वाढत जाते.
  • एकच कंटाळवाणी गोष्ट म्हणजे जास्त प्रमाणात असलेल्या जाहिराती. अर्थात तुम्हाला फुकट सेवा देण्यासाठी त्यांना जाहिराती घ्यावयाच लागत असतील.
  • फोटो एडिटिंग मध्ये फक्त रोटेट आणि क्रॉप चे (rotate and crop) बटन आहेत.


काही प्रमाणात चांगली पण किचकट अटी असलेली वेबसाइट.
  • अमर्यादित साठवण्याची जागा.
  • ते फक्त JPEG फोर्मेट मध्येच स्वीकारतात.
  • फोटो स्टोरेज बरोबर ते फोटो प्रिंट, फोटो बुक, अल्बम, किचेन , प्रिंटेड माउस पॅड, कप, कॅलेंडर अशा अनेक सुविधा पुरवतात.
  • तुमचे फ्री अकाउंट ठेवण्यासाठी त्यांच्याकडून १२ महिन्यातून एक तरी खरेदी करावी लागते.
  • मोठा तोटा म्हणजे हि साईट शेरिंग सर्विस पुरवत नाही. सुरक्षित म्हणवणारी हि साईट दुसऱ्या सदस्याचे फोटो पण बघायला देत नाही.
  • व्हिडीओ पण सेव्ह करू शकता पण .mov फॉर्मेट मधेच आणि ते सुधा फक्त तीस दिवसच. (?)
  • अर्थातच ते तुमचे ओरिजिनल साईज मधले फोटो परत करत नाही. ते तुम्हाला कमी साईज मध्येच मिळतात.
  • फेसबुक चे लॉगीन वापरू शकता.

एडिटिंग चे अतिशय चांगले पर्याय असलेली वेबसाईट, वापरायला सोपी असलेली साईट खूप ब्लॉगर वापरतात. काही वैशिष्ट्ये पाहूया.
  • फेसबुक चे लॉगीन वापरू शकता
  • एडिटिंग चे चांगले पर्याय उपलब्ध, रेड आय फ़िक्सिंग चा पर्याय पण आहे. खूप सारे एफेक्ट देऊ शकता. एफेक्ट नाही आवडले तर ओरीजिनल फोटो परत रिस्टोर करू शकता.
  • ओरिजिनल साईज मिळते कि नाही हा पर्याय अजून तपासायला मिळाला नाही आहे.
  • शेरिंग चे खूप चांगले पर्याय उपलब्ध. सिंगल फोटो तसेच पूर्ण अल्बम शेअर करू शकता. ब्लॉगर, मायस्पेस, फेसबुक सारखे अनेक साईट ला शेरिंग करणे सोपे आहे.
  • फ्री अकाउंट तुम्हाला १ जीबी ची जागा देतो व २५ जीबी ची ट्राफिक देतो. पण मी लॉगीन केले तेव्हा ५०० एमबी ची जागा आणि १० जीबी चीच ट्राफिक मिळाली बहुतेक आता कमी केली असावी. फुकट असल्यामुळे काही बोलू शकत नाही.
  • १० जीबी पेक्षा जास्त ट्राफिक झाले कि आपोआप फोटोबकेट आपले फोटो ब्लॉग वरून काढून टाकतो. (????)
  • जास्तीत जास्त १ एमबी किंवा १०२४ x ७६८ चा फोटो अपलोड करू शकतो. एका स्लाईडशो मध्ये जास्तीत जास्त २५ फोटो राहतात.
  • व्हिडीओ अपलोड ची पण सेवा आहे. पण फक्त १०० एमबी किंवा ५ मिनिटांचा

नक्की उच्चार काय आहे माहित नाही. युनिकोड मध्ये टाईप केले तर मेजुबा आले. खूप छान साईट आहे.
  • फ्री रजिस्टर करू शकता
  • अमर्यादित ट्राफिक
  • ओरिजिनल फोटो डाउनलोड करू शकता. (बॅकअप घेण्यासाठी उत्तम पर्याय)
  • अमर्यादित स्टोरेज
  • सिंगल फोटो तसेच पूर्ण फोल्डर हि अपलोड करू शकता.
  • अपलोड करण्यासाठी Window explorer सारखे ऑपरेटिंग साईट वर असल्यामुळे अपलोड करायला एकदम मस्तच.
  • १ जीबी पर्यंत फोटो अपलोड ( खूप म्हणजे खूपच जास्त) सध्या तरी एवढी सेवा कुठलीच साईट पुरवत नाही.
  • शेरिंग करायला पण सोप्पी आहे.
  • इतर सदस्याचे फोटो पाहून कमेंट करू शकता.
  • वर दिल्यापैकी फ्लिकर, पिकासा, फोटोबकेट वर अपलोड केलेले फोटो डायरेक्ट ह्या साईट वर आणु शकता.
  • जिओ -तॅग़ (GEO-TAG) पण करू शकतात .
  • फेसबुक प्रमाणे मित्र परिवार बनवू शकता.
आतापर्यंत आवडलेल्या वेबसाईट पैकी हि खुपच सुंदर साईट आहे. अजून हि खूप साईट आहेत पण त्या नंतर च्या पोस्ट मध्ये टाकेन.
लहानपणी ऐकले होते. गरज हि शोधाची जननी आहे. गरज संपली कि शोध हि थांबतो. कदाचित म्हणूनच मेजुबा साईट भेटल्या पासून मी नवीन साईट शोधायच्या थांबवले आहे.
तुम्ही पण वापरून बघा आणि कळवा. तुम्हालाहि काही साईट माहित असल्यास कमेंट मध्ये टाकायला विसरू नका

आता खूप फोटो काढा....



Read More

वर्तक नगर चे साईबाबा...

वर्तक नगर च्या साईबाबांचा २४ वा वर्धापन दिवस.

दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा वर्तक नगर च्या साईबाबांचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा झाला. शिर्डी च्या साईबाबांची प्रतिकृती असलेले वर्तक नगरचे साईबाबा म्हणजे इथल्या भक्तांची प्रती शिर्डीच. मराठी तिथी नुसार साईबाबांचा वर्धापन दिवस साजरा होतो. २९ नोव्हेंबर पासून सुरु झालेला हा उत्सव ३ दिवस चालला आणि आज त्याची सांगता झाली. तिसऱ्या दिवशी बाबांची मंदिरातून पालखी निघते आणि वाजतगाजत मोठ्या थाटामाटात तिची पूर्ण वर्तक नगर मध्ये मिरवणूक निघते. हि मिरवणूक पुढे जानका देवी च्या मंदिरात जाऊन परत साईबाबांच्या मंदिरात परतते. ह्या वेळेला रस्त्यावर मोठ्या संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढल्या जातात. पुण्यावरून खास ढोल ताशे बोलावले जातात. सुंदर आतिषबाजी केली जाते. दांडपट्टा चालवणारे, लेझीम खेळणारे, तलवार चालवणारे अनेक कलाकार आपली कला दाखवतात. एकंदरीत खूप रम्य आणि पाहण्यासारखा सोहळा असतो. ऑफिस मधून येईपर्यंत पालखी अर्ध्याहून पुढे निघून जाते. पण आज नशिबाने दर्शन मिळाले. माझ्या जुन्या घराच्या समोरच पालखी पोहोचली होती. चांगले दर्शन झाले. पालखी सोहळ्याचे दृश्ये आणि बाबांच्या मंदिरातली काही इथे पोस्ट केली आहेत.

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Photobucket

Read More

यारी कि गाडी...

हिरो होंडा ची नवी जाहिरात यारी कि गाडी बघितली आहे का?


तब न स्पीड ब्रेकर होते थे, न नो एन्ट्री
अपनी यारी कि गाडी फुरररररर सी चलती थी.
पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों
राहे बदल देता है

यारी बुला रही है....राहे दिखा रही है..
चलते ते हम जो बिछडे तो ये
ये गाडी मिला रही है....

जितनी दूर ये यारी जाये
उतनी दूर ये गाडी जाये
हिरो होंडा स्प्लेंडर ....यारी कि गाडी

आतापर्यंत पाहिलेल्या जाहिरातीतील हि सर्वात आवडती जाहिरात. सुंदर संकल्पना, सुंदर सादरीकरण, सुंदर संगीत आणि शेवटी हृदयाला स्पर्श करणारा फील.
तीन मित्र भर पावसात लहानपणी गल्लीत खेळताहेत. दोघे बसले असतात आणि तिसरा मित्र फुरररर करत गाडी चालवत येतो. बाकीचे पण त्याला सोबत देत गल्लीत गाडी चालवत फिरतात व एका चौकात बाहेर पडतात. पण तिघे तीन रस्त्याने जातात. त्यावेळेला तिघे आश्चर्यचकित होउन एकमेकांकडे बघतात. तेव्हा त्यांचे चेहऱ्यावरचे हावभाव खूप छान दाखवले आहेत. त्याच वेळेला बॅकग्राउंडला आवाज येतो.पर जिंदगी का सफर काफी तेढा होता है दोस्तों.... राहे बदल देता है.
तेच मित्र मोठेपणी आपापल्या कामधंद्यात असताना त्यांना ते दिवस आठवतात. बाहेर पण तसाच पाउस पडत असतो. खिडकीतून बाहेर बघितली तर गाडी दिसते. तशीच गाडी काढून सर्व मित्र त्याच चौकात भेटायला येतात. तिघांन पैकी एका मित्राची पॅंट वर करायची जी सवय असते ती अजून गेलेली नसते. तसेच फुररर्र्र करत गाडी चालवत गल्लीत फिरतात. शेवटी एकमेकांना येऊन मिठ्या मारतात. मानवी भावनांचे खूप सुंदर चित्रण...

ती जाहिरात माझ्या Youtube च्या साईट वर टाकली आहे.


माझ्या मित्रांना पण हेच सांगावेसे वाटते कि जरा जुन्या आठवणी जागवून पहा. ते तलावपाली वर फिरणे, कॉलेज बंक करून लायब्ररीत जाऊन बसने, बस स्टॉप वर तासनतास बस ची वाट बघत बसने, एक रुपयाचे शेंगदाणे घ्यायचे, आणि एक रुपयात सुद्धा किती कमी दिले असे बडबडत सगळे शेंगदाणे खायचे , त्यावेळेला दिवसातून १० ते १२ तास तरी एकत्र असायचो आज सहा महिन्यातून एकदा भेटायला होतेय ते सुद्धा कोणाचाना कोणाचा तरी प्रोग्राम चेंज झालेला असतो. जरा काही आठवत असेल तर बघा आठवून आणि आपापल्या गाड्या कडून या तलाव पाली ला भेटायला.
वरच्या जाहिरातीतील एका मित्राला गीटार वाजवता येत असते. माझ्या पण एका मित्राला गीटार वाजवता येते पण साल्याने कधी मनापासून तिकडे लक्षच दिले नाही. (हा ब्लॉग वाचणारे कुणी नसते तर जरा अजून शिव्या घातल्या असत्या). कधी आमची मेहफिल जमलीच नाही. त्यावेळेला वेळ होता, भेटी होत होत्या पण मजा करायला पैसा नव्हता, आज पैसा आहे तर वेळ नाही आहे भेटायला.

माझ्या सर्व मित्रांना हेच सांगणे आहे कि वेळ काढा आणि जे काही थोडेफार मित्र उरले आहोत आणि जी काही मैत्री उरली आहे ती टिकवून ठेवा. उद्या असे नको व्हायला कि पैसा कमावता कमावता, सर्व मित्रांना सोडून उंच शिखरावर जाऊन पोहोचाल, पण मागे वळून बघाल तर आम्ही शिखराच्या पायथ्याशी पण नाही दिसणार. त्यावेळेला खूप एकटे एकटे वाटेल, मित्रांची गरज भासेल पण जवळ कोणी नसेल....
जमले तर विचार करा.....आणि आपल्या आवडत्या व्यक्ती साठी,मित्रासाठी जरुर वेळ काढा...आयुष्य खूप छोटे आहे आणि वेळ खूप कमी आहे.

Read More

ह्या दिवाळीचा आकाश कंदील...


मागच्या वर्षी प्रमाणे ह्या वर्षी हि कंदील बनवण्याचे ठरवले होते. पण वेळ चा नव्हता मिळत. ऑफिस मध्ये इंटरव्यू असल्याने अभ्यासाची तयारी करण्यातच वेळ जात होता. धनत्रयोदशीच्या दिवशी पर्यंत कंदील तयार झाला नाही त्यामुळे बायकोचे ओरडणे चालू झाले होते. कंदील कधी लावणार? दिवाळी झाल्यावर बनवणार काय? तुझे तर नेहमीच असे असते.... जगाच्या मागून वगैरे वगैरे. मला माहित होते कि मी एकदा बसलो तर ३/४ तासात कंदील बनवून होईल पण वेळच नव्हता भेटत. शेवटी धनत्रयोदशीच्या दिवशी बायकोने शेवटची ऑर्डर सोडली कि आज नवीन कंदील बाजारातून विकत घ्यायचाच, मी मग बिचारा काय करणार ? पण म्हणालो आजचा दिवस दे आज रात्री कंदील बनवूनच टाकतो. मागच्या वर्षी पण असाच आकाश कंदील बनवला होता. तो एवढा चांगला नव्हता झाला. ह्या वर्षी बांबू च्या काठ्यांचा बनवायचा होता. पण शेवटच्या दिवसा पर्यंत काठ्या काही मिळाल्या नाहीत. मग शेवटी ठरवले कि साधा वालाच आकाश कंदील बनवायचं. विचार आला चला, त्या निमित्ताने ब्लॉग लिहायला एक विषय भेटला. मी कंदील बनवायचा केलेला प्रयत्न इथे दिलेला आहे.

वापरलेले साहित्य : पुठठा किंवा कार्डबोर्ड पेपर, पतंगी पेपर, कैची, कटर, स्टेपलर, फेविकॉल,एक सोनेरी पेपर, धागा, करकटक.

सर्व प्रथम पुठठा घेऊन त्याच्या समान आकाराच्या दोन पट्ट्या कापल्या. कंदिलाचा जेवढा व्यास आपल्याला ठेवायचा असेल तेवढ्या आकाराच्या पट्ट्या कापाव्यात.

ह्या पट्ट्यांना गोलाकार करून त्यांना फेविकॉल लावून स्टेपलर मारले. स्टेपलर मारल्याने फेविकॉल सुकायला वेळ मिळतो आणि गोल सुटत नाही.

त्यानंतर जेवढ्या मोठ्या आकाराचा कंदील बनवायचा असेल तेवढ्या आकाराच्या तीन पट्ट्या कापून घेतल्या.


पहिल्या गोलाकार पुठठयाच्या वर्तुळाला खाली ठेवून तीन समान अंतरावर ह्या पुठ्ठ्याला फेविकॉल लावून स्टेपलर मारले.

त्यानंतर दुसऱ्या गोलाकार पुठठयाला वर फेविकॉल लावून स्टेपलर मारले. हे पुठ्ठे थोडे मजबूत असणे जरुरीचे आहेत. नाहीतर वाऱ्याने कंदील फाटण्याची शक्यता असते.

हा कंदीलाचा सांगाडा तयार झाला.

ह्याच्या पुढचे काम थोडे किचकट आहे. आता कंदिलाच्या पाकळ्या बनवायच्या आहेत. त्यासाठी एखादि सोपिशी नक्षी निवडावी जी काढायला सोपी असेल आणि कैची ने कापायला पण सोपी असेल. ह्यासाठी रद्दी च्या वर्तमान पत्रावर पहिले सराव करावा. त्यातून एक नक्षी ठरवावी आणि बाकीच्या पाकळ्या त्यानुसार बनवाव्या.


पेपर ला चार घडी अशा रीतीने मारावी कि ज्याने आपल्याला फक्त एका बाजूनेच कापावे लागेल आणि उघडल्यावर त्याची अख्खी पाकळी बनेल. हे जरा किचकट असले तरी सरावाने लवकरच जमते.


वर्तमानपत्रावर कापलेली नक्षी आधार म्हणून घेऊन सर्व पतंगी पेपर एकाच आकाराचे कापावेत.

कापलेली घडी उघडल्यावर पाकळी अशी दिसेल.




ह्या पाकळीची दोन्ही टोके फेविकॉल ने चिटकवून घाव्यीत. सर्व कामासाठी खळ अथवा फेविकॉल वापरावा, साधा गम वापरण्याचे टाळावे जेणेकरून कंदील वाऱ्यावर सुद्धा न फाटता चांगला राहतो.

नंतर सोनेरी पेपर चा ठिपके अथवा चौकोनी तुकडे कापून घ्यावीत आणि ते पाकळीवर अशा पद्धतीने चिटकवावीत.आपल्या कंदिलाच्या सांगाड्याचा घेर लक्षात घेऊन आवश्यक तेवढ्या पाकळ्या कापून तयार ठेवाव्यात.


नंतर आधी बनवलेल्या सांगाड्यावर एकामागून एक पाकळ्या शक्य तेवढ्या जवळ लावाव्यात. पाकळ्या जवळ लावल्याने कंदील भरगच्च वाटतो आणि मागील पुठ्ठ्याचा सांगाडाहि दिसत नाही.


नंतर सोनेरी पेपर च्या दोन पट्ट्या कापून घ्याव्यात. बाजारात मिळणाऱ्या सोनेरी पेपर ला पर्याय म्हणून गिफ्ट पेपर पण वापरू शकतो. मी सुद्धा सोनेरी रंगाचा गिफ्ट पेपर वापरला आहे. गिफ्ट पेपर ला जास्त चमक असते आणि आतमध्ये लाईट सोडली असता ती जास्त चमकून दिसते. फक्त हा पेपर जास्त लवचिक असल्याने कापताना जरा त्रास होतो. सरळ रेषेत कापायला जमत नाही. (शक्यतो सोनेरी पेपरच वापरावा कारण इतर चंदेरी आणि रंगीत पेपरने कंदील खुलुन दिसत नाही. मी ते सर्व प्रकार करून बघितले आहेत. सोनेरी पेपर चा चांगला वाटतो.)

सर्व पाकळ्या लावून झाल्यावर कंदील अश्या प्रकारे दिसेल. इथ पर्यंत कंदीलाचे ७०% हून काम पूर्ण होते.

आता कंदिलाच्या शेपट्या बनवायच्या. शेपट्या सरळ रेषेत येण्यासाठी पेपर ची अशा रीतीने घडी मारावी जेणेकरून आपल्याला फक्त तुकडाच कापावा लागेल.

समान अंतराचे तुकडे कापून ते मोकळे करावेत. अशा तऱ्हेने शेपट्या तयार होतील.

ह्या शेपट्या खालच्या बाजूने एकमेकांमध्ये अंतर न ठेवता आतल्या बाजूने चिटकाव्यावत.


कंदील जवळपास असा दिसेल.




त्याच्या वरच्या बाजूला कैचीने अथवा करकटकने छोटे छिद्र करून त्यात धागा ओवला. आत मध्ये बल्ब सोडला आणि अशा रीतीने कंदील तयार झाला.


आता सर्वात शेवटी हाताला लागलेला फेविकॉल काढत बसायचा मला हा टाईम पास खूप आवडतो.
|| शुभ दीपावली ||

Read More

वर्तक नगरची जानका देवी

परवा वर्तक नगरच्या (ठाणे) जानका देवी च्या मंदिरात गेलो होतो. हे मंदिर खूप जुने आहे. लहान पणी(म्हणजे अंदाजे १९८४ ते १९९० च्या काळात ) आम्ही ह्या मंदिरात महिन्या दोन महिन्यातून एकदा तरी जायचो. शहरात असून सुद्धा एखाद्या गावात आल्यासारखे वाटायचे. कोंबड्याचे आरवणे, मातीचा सुवास,कौलारू मंदिर, पोटापर्यंत दाढी असलेले आणि मागे कंबरे पर्यंत केसांच्या जटा असलेले पुजारी बाबा, पुजारी बाबांनी पाळलेले व अंगावर येणारे पण न चावणारे कुत्रे, आजूबाजूला असलेले घनदाट जंगल, इंग्रजांच्या काळातले एक पडीक चर्च, भयाण वाटणारे त्याचे अवशेष, संध्याकाळी सात वाजताच पडणारा गुडूप अंधार.... सर्व काही डोळ्यासमोर तरळून गेले. जणू काही आताच काही महिन्यापुर्वी घडले होते. सर्व आठवणी उगाळत विजु बरोबर पायऱ्या उतरलो. त्यावेळचे मंदिर आणि आत्ताचे मंदिर ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झाला आहे. त्यावर केलेली प्रकाश योजना त्याचे सौंदर्य खुलवत होती.




मंदिरा पर्यंत जायचा मार्ग हि चांगला झाला होता. आता कार, बाईक अगदी मंदिरापर्यंत जाऊ शकते. त्यावेळेला एक पैदल पूल होता. तो चढून मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता होता. गाडी जायला रस्ता नव्हता. मंदिराच्या समोरच एक चर्च आणि इंग्लीश शाळा आहे. त्या चर्च मध्ये व शाळेमध्ये यायला रस्ता विरुद्ध दिशेने आहे. पण त्या दिशेने मंदिरात यायला परवानगी नाही. मंदिरात यायचा पुल काही वर्षापूर्वी कोसळलाआणि त्या नंतर त्यावर नवीन पूल बांधला गेला. तो पूल मग गाडी ये जा करू शकते असा बांधला गेला त्यामुळे खूपच चांगले झाले.

मंदिरातून आत शिरलो आणि गाभाऱ्या पर्यंत पोचलो. पुजारी बाबांची आठवण झाली, ते गाभाऱ्यात पायांवर बसायचे आणि ओटी घ्यायचे. देवी पुढचे गंध भक्तांच्या कपाळाला लावायचे. गाभारा खूप छोटा होता आणि खूप अंधारात होता. त्यात एक छोटा बल्ब सोडलेला असायचा. आता त्याच गाभाऱ्याचे सौंदर्य खुलून आले होते. मातीच्या भिंती जाऊन तेथे मार्बल च्या भिंती आल्या आहेत. त्यात देवी चे रूप अजून खुलून दिसतहोते. चक्क गर्दी कमी असल्यामुळे आणि मी उशिरा गेल्यामुळे जास्त माणसे नव्हती.त्यामुळे चांगले फोटो काढता आले. खूपच प्रसन्न वाटले.




मंदिरा समोरच मैदान आहे. लहानपणी तेथे क्रिकेट चे सामने व्हायचे त्यावेळेला देवीचे दर्शन करायला जायचो. मधल्या काळात जवळपास कितीतरी वर्ष मंदिरात जाता आले नाही. खूप वर्षांनी गेल्यामुळे मन अजूनच प्रसन्न झाले. मंदिरातून निघताना बाहेर गोंधळी होते. हे गोंधळी थेट तुळजापूर वरून येथे येतात. नऊ दिवस त्यांचा इथेच मुक्काम असतो. दसरा झाला कि ते दुसर्‍या दिवशी आपल्या गावी परततात. त्यांचे हि छायाचित्र काढावेसे वाटले. त्यांच्या झोळीत दहा ची नोट टाकली तर त्यांनी आम्हा दोघांना अगदी भरभरून आशीर्वाद दिले.


तुळजापुरचे ग़ोंधळी.

तुळजापुरचे ग़ोंधळी.

तुळजापुरचे ग़ोंधळी.

त्यांचा आशीर्वाद घेऊन मंदिरातून बाहेर पडलो. विजूला हि मंदिर खूप आवडले. लग्न झाल्यापासून का नाही आणले एवढ्या चांगल्या मंदिरात? मी काय उत्तर देणार जे जे नशिबात असते ते ते त्याच वेळेला मिळते. मंदिरातून निघताना मन खूप जड झाल्यासारखे वाटले. मग विचार केला कि हे मंदिर आपलेच आहे. आपल्याच परिसरात आहे. कधी पाहिजे तेव्हा येऊ शकतो. तेव्हा कुठे मन हलके झाले. आणि आम्ही निघालो.

----

पुजारी बाबा व धर्मवीर आनंद दिघे ह्यांचा एक जुना फोटो.


झाडामध्ये आलेला ग़णपतीचा आकार

देवीची एक जुनी मुर्ती

शंकराची पिंड


Read More