हनिमूनला गेल्यावर...

हनिमूनला गेल्यावर... 

मागच्या पोस्ट मध्ये हनिमून ला जाण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी लिहिले आहे. सर्व तयारी करून हनिमून ला पोचल्यावर कोणत्या गोष्ठी लक्षात ठेवू शकता हे इथे दिले आहे.

  1. हनिमून च्या ठिकाणी सकाळी किंवा दुपारी पोचाल अशा हिशोबाने निघा कारण नवीन शहरात हॉटेल शोधताना त्रास होऊ शकतो. जर तुम्ही पॅकेज मधुन जाणार असाल तर टूरिस्ट वाले तुमच्या साठी सर्व बंदोबस्त करून ठेवतात पण जर तुम्ही स्वत: प्लॅनिंग केले असेल तर दिवसा उजेडी नवीन शहरात पोहचणे चांगले. किंवा जर तुम्ही हॉटेल बुकिंग केले असेल तर हॉटेल वाले हि तुमच्यासाठी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वर गाडी पाठवतात. 
  2. प्रवासात आपल्या पार्टनर ला कधीही एकटे सोडू नका. जर चुकामुक झाली तर खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे बस अथवा रेल्वे स्टेशन ला थांबली असताना फिरून येणे टाळा. जर गाडी चुकली तर विचार करून बघा नवीन शहरात किती मनस्ताप होईल ते ?
  3. तुम्ही जर टॅक्सी किंवा रिक्शाने जर हॉटेल वर पोचणार असाल तर छोट्या छोट्या गोष्टीवरून किंवा पैशावरून त्यांच्याशी हुज्जत घालू नका अशाने तुमचा मुड हि खराब होतो आणि पार्टनर समोर इमेज हि खराब होते.
  4. हनिमुनला गेल्यावर मनमोकळा खर्च करा. काही पैशांसाठी चांगल्या हॉटेलात जाणे, वस्तू विकत घेणे टाळू नका. (त्यासाठी तुम्हाला आयुष्यभर ऐकावे लागू शकते.)
  5. हनिमून ला गेल्यावर पैशांचे पाकीट बाळगण्यापेक्षा प्लास्टिक मनी म्हणजेच डेबिट कार्ड/ क्रेडीट कार्ड वापरा ते सोयीस्कर पडते. पण हाताशी सुट्टे पैसे पण बाळगा. सर्व पैसे स्वत: कडे न ठेवता अर्धे आपल्या पार्टनर कडे देऊन ठेवा जेणेकरून जर तुमचे पाकीट कधी मारले गेले तर तुमच्या पार्टनर कडे तरी काही पैसे राहतील.
  6. सहसा हनिमूनला गेल्यावर नवदाम्पत्यांची चांगली बडदास्त ठेवली जाते. हनिमून कपल ला सर्व ठिकाणी आदराने मदत केली जाते. त्यामुळे  हॉटेल मध्ये गेल्यावर तिथे तुम्ही हनिमून ला आला आहात असे समजले तर हॉटेल वाले तुमची चांगली खातिरदारी करतात. काही हॉटेल मध्ये स्पेशल हनिमून स्युट असतात ते तुम्हाला मिळू शकतात. ते तुमची रूम चांगली सजवूनहि देतात. नसेल देत तर काही पैसे देऊन तुमची रूम चांगली सुवासिक फुले किंवा सुगंधी मेणबत्ती लावून सजवून घ्या. त्याने तुमची रात्र नक्कीच चांगली जाईल.
  7. महत्वाचे : रूम वर गेल्यावर सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व रूम चेक करा. आजकाल छुपे कॅमेरे आणि टू साईड मिरर मुळे तुमचे खाजगी जीवन धोक्यात येऊ शकते.कदाचित हे वाचायला तुम्हाला विचित्र वाटेल पण ह्या गोष्टींची शक्यता टाळता येत नाही अगदी मोठी मोठी ५ स्टार हॉटेल हि ह्या प्रकरणात सामील असतात. त्यामुळे आपण काळजी घेतलेली बरी.
  8. हे कॅमेरे शक्यतो एखाद्या वस्तुत लावले असू शकतात जेथून तुमचा बेड व्यवस्थित दिसतो. त्यामुळे रुम मधल्या सर्व वस्तू चेक करणे चांगले. जसे भिंतीवरील एखादे पेंटिंग, शोपीस , बेड वर लावलेले डिझाईन , फ्लॉवरपॉट, पेन, रंगीत दिवे, आरसे, कुठलीही इलेक्ट्रिक वस्तू, बाथरूम मधील एखादा नको असलेला पाईप, बाथरूम च्या खिडक्या वगैरे अनेक गोष्टीमध्ये छुपे कॅमेरे असू शकतात. त्यामुळे सर्व वस्तू हलवून, फिरवून ठेवणे चांगले. 
  9. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न झाल्यावर इतक्या विधी असतात कि जेणे करून नवीन कपल ला हनिमून ला जाण्यापूर्वी खूप वेळ मिळतो. ह्या सर्व प्रसंगात आपल्या पार्टनर ला ओळखून घ्यायचा प्रयत्न  करा. वेळ आणि एकांत मिळेल तेव्हा एकमेकांना हलकाच चोरून स्पर्श करा. सर्वांच्या नकळत हलकेच हात हातात घेऊन दाबा. अगदीच मिळाले तर गालावर चुंबन करा. जेणेकरून एकमेकांच्या स्पर्शाची सवय होईल आणि हनीमून च्या वेळेला तुमच्या मिलनाच्या इच्छा चांगल्या जागृत होतील.
  10. आज कालच्या मुली जरी मॉड असल्या तरी काही मुली आपले घर, आई वडील ह्यांना सोडून आल्या असल्यामुळे जरा नाराज असतात. सासर चे नवीन आई वडील, नवीन कुटुंब, खाण्याच्या, राहण्याच्या पद्धती ह्यामुळे जरा बावरलेल्या असतात. त्यात एक पुरुषाबरोबर नवीन ठिकाणी जावे लागल्यामुळे हि जरा घाबरलेल्या असतात. त्यामुळे एकदम त्यांच्यावर तुटून पडू नका. प्रवासात त्यांच्याशी गप्पा मारा त्यांना विश्वासात घ्या. हातात हात घेऊन हलकेच दाबा त्यामुळे त्यांना विश्वास वाटेल आणि जरा सावरायला मदत होईल.
  11. आई वडिलांना सोडून आल्यामुळे मनातून उदास असतात त्यामुळे वेळ भेटेल तेव्हा त्यांना घरी फोन लावून द्या. त्यामुळे जरा उदासी कमी होईल. (तुम्हाला रोमिंग चार्जेस लागतील पण ते दुर्लक्ष करा. फोन लावायच्या आधी त्यांना कल्पना द्या. फोन लावल्यावर सांगू नका...त्यांना राग येतो) 
  12. फिरायला गेल्यावर पार्टनर ला एकटे सोडून जावू नका. कुठे चुकामुक झाली तर कुठे भेटायचे हे सांगून ठेवा. मोबाईलची रेंज असेलच सांगता येत नाही. 
  13. साईट सीइंगचे, फिरण्याचे शेड्युल आधीच आखून ठेवावे. मोजक्याच जागा बघाव्या अन्यथा थकायला होते आणि रात्री जगायचे पण असते ना !! 
  14. हनिमून च्या पहिल्याच रात्री घाई करू नका जर लग्न अरेंज मॅरेज असेल तर दोघांनी एकमेकांना समजण्यास वेळ घ्यावा आणि मगच शारीरिक संबध प्रस्थापित करावे. 
  15. जेवताना  प्रमाणात खा आणि खाल्ल्यावर दात घासायला विसरू नका. माउथ फ्रेशनर चा उपयोग हि करू शकता. जेवल्या जेवल्या लगेच बेड वर जाऊ नका. जवळपास फेरी मारून या किंवा हॉटेल च्या बगीच्या मध्येच फेरी मारा.
  16. नशापान करणे टाळा. पार्टनर वर वेगळाच परिणाम पडू शकतो.
  17. खाताना, फिरताना, काही गोष्ट करताना वाद टाळा. एकमेकांवर कमेंट मारू नका किंवा एकमेकांचा पाणउतारा करत बसू नका. काही चुकले तर एकांतात किंवा रूम वर आल्यावर समजावून सांगा.
  18. लग्नात आलेले कौटुंबिक समस्या, लग्नातले वाद, देवाण घेवाण वरून झालेले वाद आपल्या हनिमूनला तर नक्कीच टाळावे. ऑफिस च्या गोष्टी, फोन टाळा.
  19. शक्य तवढे दागिने आणि मौल्यवान वस्तू  कमीत कमी घेऊन जा.
आता काही मिलनापुर्वीच्या महत्वाच्या गोष्टी 
  1. पहिल्याच रात्री शारीरिक संबंध साठी घाई करू नये. जर अरेंज मॅरेज असेल तर मुलीला सावरायला वेळ लागतो. पहिल्या रात्री गप्पा हि मारू शकता एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घेऊ शकता. 
  2. मिलनापुर्वी अंघोळ नक्की करा त्याने अंगाला घामाचा वास हि नाही येणार आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
  3. पार्टनर ला हलकेच स्पर्श करा, हात हातात घेऊन हलकेच दाबा. एकांतात मिठीत अलगद ओढून घ्या. लाजून मुलगी बाजूला होत असेल तर तिला होऊ द्या पुढच्या वेळेला मिठीत घेतली कि ती नाही बाजूला होणार. ओठांवर चुंबन घेण्याची घाई करू नका. पहिले गालावर करा, कपाळावर करा आणि मग ओठांवर करा.
  4. वातावरण निर्मिती करण्यासाठी लाईट डीम करू शकता, रूम सुगंधित करू शकता, एखादी सुगंधी अगरबत्ती लावू शकता. सुगंधी फुले बेड वर टाका. रोमॅंटिक  गाणे लावा. गाणे लावायला काही नसेल तर मोबाईल मध्येच लावा. 
  5. वातावरण निर्मिती झाली कि मग हलकेच स्पर्श करा. स्पर्शात जी भावना व्यक्त करण्याची ताकत असते ती कशात हि नाही. हळुवार आलिंगन द्या कुठेही घिसाड घाई करू नका.
  6. आधी सांगितल्याप्रमाणे पार्टनर ला काहीतरी सरप्राईज  गीफ्ट द्या. छान अशी अंतर्वस्त्रे द्या.बाजारात हनिमून स्पेशल अशी अंतर्वस्त्रे मिळतात.  त्याच्यासाठी किंवा तिच्यासाठी एक छानसे आपल्या हाताने प्रेम पत्र लिहा. प्रेम पत्र कसे लिहायची ह्याच्या काही छान टिप्स तुम्हाला प्रशांत रेडकर ह्यांच्या ब्लॉग वर मिळतील.
  7. आजकाल च्या मुलांमध्ये एक भीती असते, तणाव असतो कि आपण हे करू शकू कि नाही आपण लवकर एक्साईट होऊन काही गडबड तर नाही ना करणार. ह्या तणावामुळे मुले चांगले प्रेम हि करू शकत नाही. तीच गोष्ट मुलींच्या बाबतीत असते. भीतीमुळे त्यांचे शरीर त्यांना साथ देत नाही आणि नर्वसनेस मुळे त्या प्रतिसाद देऊ शकत नाही आणि पहिली रात्र तणावाखाली वाया जाते. ह्या सर्व गोष्टींचे टेन्शन न घेता बिनधास्त प्रेम करावे. काही चुकले माकले तरी ते दोघांमध्येच राहणार असते. दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्यावे.
  8. तुझे हे पहिले चुंबन होते का ? तुझे हे पहिले प्रेम होते का ? तुझ्या आयुष्यात आलेला मी पहिलाच/ पहिलीच आहे ना ? असे फालतू प्रश्न विचारू नये. समजा उत्तर "नाही" आले तर ..ते सहन करायची ताकत असायला हवी.
  9. फॅमिली प्लॅनिंग नक्की करा. निदान सुरवातीचे २ वर्षे तरी.
  10. जास्त  डीटेल मध्ये आता लिहीत नाही बाकी तसे आपण सुज्ञ असलाच.
आणि हो ! सर्वात शेवटी महत्वाचे म्हणजे दोन्ही कुटुंबासाठी काही भेटवस्तू आणायला विसरू नका त्याने तुमचे सासर बरोबर रिलेशन चांगले राहतात आणि बायको पण खुश राहते.....

मधुचंद्राच्या शुभेच्छा !!!
Happy Honeymoon. !!!















(सर्व चित्रे नेट वरून साभार/ Image Source: Internet)

Read More

हनिमुनला जाण्यापुर्वी

हनिमूनला  जाण्यापूर्वीच्या टिप्स 


नुकतेच माझ्या एका मित्राचे लग्न झाले. ३ ते ४ दिवसांनी तो हनिमून ला जाईल. तेव्हा सिनिओरिटि च्या नात्याने त्याने माहिती विचारले. सिनिओरिटि अशा साठी कि माझे लग्न होऊन दोन वर्षे होत आली आहेत आणि आम्ही हनिमून ला जाऊन आलोय. अर्थातच आपल्याला कुणी भाव देऊन विचारले तर नक्कीच आपण २ इंच छाती फुगवून त्याला आपल्या अनुभवाचे बोल सांगतो. तसेच काही माझ्या बाबतीत हि झाले. म्हटले ज्या टिप्स त्याला दिल्या आहेत तेच ब्लॉग वर टाकू जेणेकरून इतरांना हि फायदा होईल.

काही गोष्टी अनुभवाच्या आहेत तर काही आजूबाजूच्या परिस्थिती वर अवलंबून आहेत.लग्न झाले आणि सर्व धार्मिक विधी उरकत आले कि नवदाम्पत्यांना हनिमून ची ओढ लागायला लागते. प्रत्येकालाच आपला हनिमून हा चांगल्या शहरात, मोठ्या हॉटेलात, सुंदर निसर्गरम्य वातावरणात आणि एकांतात  साजरा करायचा असतो. पण काही छोट्या मोठ्या चुकांमुळे व काही गोष्टी विसरल्यामुळे हनिमून च्या मजेवर पाणी फिरू शकते.
हनिमूनला जाण्यापूर्वी 
  • हनिमून चे ठिकाण निवडण्यापूर्वी आपल्या पार्टनरचा विचार नक्की घ्यावा. असे नको व्हायला कि तुम्ही जिथे बुकिंग कराल तिथे तुमचा पार्टनर आधीच आपल्या कुटुंबाबरोबर जाऊन आला किंवा आली असेल तर मग तुमची सगळी मजाच जाईल. एक वेळ मुले जाऊन असेल तरी ठीक आहे. जेणेकरून नवीन जोडप्यांना अनोळखी ठिकाणी फिरताना अडचण होणार नाही.
  • स्थळ निवडताना असेही होऊ शकते कि तुम्ही आपल्या भावी पत्नीला विचारात असाल तर ती लाजेल सुद्धा, अशावेळी तिला सरळ प्रश्न न विचारता विश्वासात घ्यावे आणि गप्पांच्या ओघात तिच्या मनाचा कल जाणून घ्यावा. 
  • हनिमून चे ठिकाण ठरवताना तिथल्या वातावरणाची, ऋतू, तिथले सण/उत्सव ह्याची सुद्धा माहिती घ्यावी. कारण जर थंडीच्या दिवसात तुम्ही हिल स्टेशन ला गेलात तर तिथली थंडी तुम्हाला सहन होत नाही. आता  पूर्ण कपडे घालून हनिमून कसा करणार ? काही शहरामध्ये तिथले धार्मिक उत्सव चालू असतात अशा वेळी जर आपण तिथे हनिमून ला गेलो तर राहण्यासाठी हॉटेल मिळत नाही, शहरात गर्दी असल्यामुळे हनिमून ला लागणारा एकांतहि मिळत नाही. उदाहरण द्यायचे झाले तर दसऱ्याच्या सुमारास जर मैसूर ला गेलात तर राहायला हॉटेल्स नाही मिळत. राजवाड्यातून निघणारी मिरवणूक बघण्यासाठी खूप पर्यटक येतात. 
  • स्थळ जेवढे शांत, रमणीय आणि सुंदर असेल तितकाच तुमचा हनिमून मादक आणि बेभान होतो. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या ठिकाणावरच तुमचा ५०% हनिमून सक्सेस होतो.
  • हनिमून पॅकेज देणाऱ्या अनेक कंपनी किंवा खाजगी टूरिस्ट वाले असतात. सगळ्यांची पॅकेज चांगली बघून घ्यावी पूर्ण माहिती काढावी मगच निर्णय घ्यावा. जर नेट वरून बुकिंग करणार असेल तर आधी जाऊन आलेल्या लोकांचे कमेंट नक्की वाचावे. कधी कधी हॉटेल चे फोटो खूप चांगले लावलेले असतात पण प्रत्यक्षात हॉटेल्स तेवढे चांगले नसतात.
  • ठरवलेले ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीचे सर्व पर्याय (रस्ता,रेल्वे,हवाई) बघावे. जर रस्ता प्रवासाने जाणार असेल तर बस ची कंडीशन नक्की बघून घ्यावी. कारण प्रवासात नंतर त्रास होतो. रेल्वेने जाणार असेल तर तिकीट कन्फर्म असेल तरच जावे. नवीन नवरीला घेऊन उभ्याने प्रवास केला तर आयुष्यभर बायकोचे ऐकावे लागेल. हवाई प्रवास असेल तर पहाटेचे विमान पकडावे जेणेकरून तुम्ही दिवसा नवीन ठिकाणी पोहोचाल आणि काही शोधायचे असेल तर दिवसा शोधणे सोपे असते. नवीन ठिकाणी रात्रीचे उतरल्यावर हॉटेलपर्यंत पोचण्याचा त्रास होऊ शकतो. कारण आपल्या देशातली जास्तीत जास्त विमानतळे (काही मुख्य शहरातील अपवाद सोडला तर) हि शहरापासून दूर आहेत.
  • शक्य असल्यास कमीत कमी ७/८ दिवसांचे ते १५ दिवसापर्यंतचे पॅकेज बुक करावे. चार पाच दिवसांचे पॅकेज स्वस्त असले तरी वेळ खूप कमी भेटतो आणि हनिमून चा आनंद घेतल्या सारखा वाटत नाही. 
  • बजेट जेमतेम असेल आणि वेळ कमी असेल तर जाताना रेल्वेचा प्रवास करू शकता आणि येताना विमानाने प्रवास करू शकता. येताना थकला असता ना !
  • विमानाने प्रवास करताना काही लिक़्विड वस्तू जसे लोशन, हेअर क्रीम वगैरे घेऊन जाऊ नका. नेलकटर, शेविंग किट अगदी बिसलेरीचे पाणी हि घेउन जायला परवानगी नसते. त्यामुळे जेवढ्या गरजा आहेत तेवढेच सोबत घ्या. 
  • काही महत्वाच्या वस्तू म्हणजे माउथ फ्रेशनर, परफ्यूम, डीओ जेणेकरून तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर राहताना एकदम फ्रेश राहाल.
  • हनिमून ची तारीख पक्की करण्याआधी भावी वधूची मासिक सायकल पण लक्षात घेणे जरुरी आहे. जर तुम्ही ह्या गोष्टीवर तिच्याशी बोलू शकत नसाल तर आपल्या घरातील कोणी बायका मंडळीना सांगून माहिती करून घ्या. नाहीतर तुमचा मधुचंद्र पूर्ण वाया जाऊ शकतो. जर हि गोष्ट लक्षात नाही राहिली आणि तुम्ही आधीच बुकिंग करून ठेवलं असेल आणि मुलीची तारीख पण त्याच दरम्यान असेल तर डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या आणि मुलीच्या तारखा पुढे ढकलण्यासाठी गोळ्या हि घेऊ शकता.
  • हनिमून हा आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आपल्या पार्टनरला अशी एखादी त्याची आवडती वस्तू द्या कि ती त्याने आयुष्यभर आठवणीत ठेवली पाहिजे. पण हि वस्तू हनिमून ला जाण्यापूर्वी घेतलेली चांगली कारण नवीन ठिकाणी जाऊन तुम्ही शोधणार कुठे ? आणि पार्टनरला सरप्राईज हि राहणार नाही.
  • ह्या वस्तू मध्ये तुमच्या ऐपती प्रमाणे अगदी गुलाबाचे फुल पासून सोन्याचा एखादा दागिनाहि घेऊ शकता. ह्यात फुले, एखादा सुंदर ड्रेस, साडी, पर्स, छोटे दागिने, एखादे आवडते पुस्तक, मुव्हीची सीडी (जो तुम्ही लग्न आधी एकत्र बघितलेला असू शकतो), मोबाईल, घड्याळ, अंतर्वस्त्रे (लिन्जेरी), स्वत: लिहिलेले प्रेमपत्र  वगैरे गोष्टी देऊ शकता. महाग वस्तू घेतली असेल तर जास्त आकडू नका नाहीतर पार्टनर ला वाटेल कि पैशाने प्रभावित करतोय आणि एखादी स्वस्त वस्तू घेतली असेल तर पार्टनरला त्या मागच्या तुमच्या भावना समजावून सांगा अन्यथा असे वाटेल कि आपला पार्टनर किती कंजूष आहे.
  • हनिमून चा अर्थ हा बहुतेकजण फक्त मौजमजा, फिरणे आणि शारीरिक संबंध एवढाच घेतला जातो. माझ्या मते हा समज काढून टाकावा हनिमून कडे एक आपल्या सुंदर वैवाहिक जीवनाची सुरुवात म्हणून बघावे. पहिले मनाचे मिलन झाले पाहिजे मग शरीराचे मिलन सहज होते.
  • हनिमून च्या आठवणी कायम राहण्यासाठी कॅमेरा किंवा विडीओ शुटींग हि करू शकता. पण आपल्या खाजगी क्षणांची शुटींग करणे टाळावे. करण्यात काही अडचण नसते पण भीती हीच असते कि ती तुमच्याकडून गहाळ किंवा चोरली गेली तर आपले खाजगी जीवन बाहेर पडू शकते. काही जण मोबाईल मध्ये आपल्या पार्टनर ची शुटींग करतात आणि मोबाईल चोरी ला गेला किंवा दुरुस्तीला दिला कि  प्रॉब्लेम होऊ शकतो आणि  आपले खाजगी क्षण सहज पब्लिक क्षण होऊन जातात.  कोणी आपल्याला ब्लॅकमेल हि करू शकतो. 
  • प्रवासात लागणाऱ्या तसेच नवीन ठिकाणी लागणाऱ्या वस्तूची शक्यतो यादी बनवून ठेवा जेणेकरून आयत्यावेळेला घाई होणार नाही आणि वस्तू विसरणारहि नाही.

ह्या झाल्या काही बेसिक गोष्टी ज्या हनिमून ला जाण्यापूर्वी विचारात घेऊ शकता. हनिमून ला गेल्यावर काय काळजी घ्यावी ह्या पुढच्या भागात लिहिल्या आहेत.



(सर्व चित्रे नेट वरून साभार/ Image Source: Internet)

Read More

Valentine Hearts

माझ्या ब्लॉगवर  अपडेट केलेली Valentine theme बघितलीच असेल. हि थीम जर तुम्हाला पण लावायची असेल. तर ह्या ब्लोगरमिंट च्या साईट वर टिचकी मारा. Falling Heart wiget वर टिचकी मारा. ती लिंक तुम्हाला तुमच्या ब्लॉगर पेज वर घेऊन जाईल. तेथे लॉगिन करा. मग ती लिंक तुम्हाला Add Page Element वर घेऊन जाईल. तेथे तुमचा ब्लॉग निवडा आणि Add Widget वर टिचकी मारा.
आणि आता ब्लॉग चेक करा
Soooo Cooooollllll na !!!!

आता तुमच्या पार्टनर ला तुमचा ब्लॉग चेक करायला सांगून सरप्राईज करा.
प्रेमदिवसाच्या शुभेच्छा....


(image: net)

Read More

काळाघोडा फेस्टिवल २०११







दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा काला-घोडा फेस्टिवलची जोरदार सुरुवात झाली. मी शनिवारीच जाऊन बघून आलो. पण ब्लॉग वर अपडेट करायला दुसरा शनिवार उजाडला. खर तर पुढचे सात दिवस ऑफिस मधून सुट्टी काढून दिवसभर तिथे राहायला पाहिजे. पण काय करणार जमण्यासारखे नाही आहे. खरच ज्याला कले मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याने नक्कीच इथे भेट दिली पाहिजे. काही काढलेले निवडक फोटो खालील फोटोब्लॉग लिंक वर देत आहे.

Read More

भारतीय टपाल खात्याचा नविन उपक्रम


            मागच्या आठवड्यात नाशिक प्रेस ला भेट दिली होती. त्यावेळेला पोस्टाच्या उच्च अधिकाऱ्यांशी भेट झाली होती. हे मागच्या ब्लॉग मध्ये नमूद केले. त्यात एक गोष्ट सांगायची राहून गेली. ते म्हणजे पोस्ट एक नवीन योजना चालू करत आहे. "माय पोस्ट". ह्या योजने अंतर्गत आपण आपला फोटो पोस्टाचे तिकिटावर लावू शकतो. आतापर्यंत आपण देशाच्या नेत्यांचेच फोटो बघत आलो आहे पण आता आपले फोटो हि आपण स्टँप वर लावू शकतो. ह्या साठी पोस्टाने एक विशिष्ट प्रकारचे स्टँप बनवले आहेत. त्यात फोटोची जागा मोकळी ठेवली आहे. तुम्ही तुमचा फोटो दिला कि १० ते १५ मिनिटात आपला फोटो त्या रिकाम्या जागेवर लावून मिळतो आणि आपला स्टँप प्रकाशित होतो. इतर देशामध्ये हि प्रथा चालू आहे. आपल्या देशामध्ये तेलगी सारख्या माणसांमुळे अजूनहि सुरक्षेच्या कारणास्तव हि सेवा चालू झाली नव्हती. गेल्या काही वर्षापासून पोस्टाच्या तिकिटाचा खप कमी झाल्याने कदाचित हि योजना चालू करत आहेत. आता जर तुम्ही कोणाला पत्र पाठवणार असाल तर स्वत:चा स्टँप लावून पाठवायचा जेणेकरून पत्र स्वीकारणार्‍या व्यक्तीला पत्र उघडायच्या आधीच पत्र कोणी पाठवले आहे ते समजेल.
 दुसरी खास योजना म्हणजे, खादीचे स्टँप तिकीट. देशात पहिल्यांदाच खादी वर स्टँप तिकीट बनवले जात आहे. ह्या स्टँप साठी लागणारी खादी शोधण्यासाठी नाशिक प्रेसला खूप मेहनत करावी लागली. खादी वर प्रिंटींग करताना स्टँप ची शाई पसरून स्टँप खराब व्हायचा. त्यासाठी वेगवेगळ्या प्रदेशातले आणि देशातले कापूस मागवून खादी तयार करून बघितली गेली. शेवटी पश्चिम बंगाल मधील एक प्रदेशात चांगल्या प्रकारचा कापूस मिळाला जो धाग्यांना घट्ट पकडून शाई पसरण्यापासून वाचवत होता. मग त्या कापसाची खादी बनवून त्यावर महात्मा गांधीचे चित्र छापून पोस्टाचे तिकीट बनवण्यात आले.  हे तिकीट खूप अनमोल ठरणार आहे कारण ह्याच्या फक्त १ लाख प्रती छापल्या जाणार आहेत. ज्यांना मिळाल्या त्यांच्यासाठी पर्वणी.
भारतीय टपाल खाते एक अभिनव प्रदर्शन आयोजित करत आहे. हे प्रदर्शन  १२ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित केले जाणार आहे. त्या प्रदर्शनात ह्या स्वत:चा फोटोवाले तिकीट आणि खादी तिकीट प्रकाशित होणार आहे. वरील तारखे दरम्यान दिल्लीत असाल तर ह्या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या.

Read More

माझ्यासाठी एक सुवर्णयोग....

मागच्या शुक्रवारी ऑफिस च्या कामानिमित्त नाशिक सिक्युरिटी प्रेस ला भेट देण्याचा योग आला.  हा !!! मला विश्वासच नाही बसत आहे कि मी नाशिक सिक्युरिटी प्रेस ला भेट देऊन आलो आहे.  चेकबुक आणि प्रशासन खात्यात असल्यामुळे अनेक छोटे मोठे शेकडोंनी प्रिंटर आणि त्यांच्या कंपनी बघण्याचा योग आला आहे. पण नाशिक प्रेस बघणे म्हणजे आयुष्यातला एक मोठा सुवर्णयोगच होता. 

सरकारचे राजस्व विभाग (Department of Revenue) म्हणून एक खाते आहे. जे स्टॅम्प ड्युटी, फ्रॅंकिग, स्टॅम्प पेपर च्या संदर्भातील कामे बघते. ह्या खात्या अंतर्गत एक नवीन उपक्रम चालू होत आहे. आपल्याला जे करार करण्यासाठी लागणारे स्टॅम्प पेपर मिळतात. ते आता आपण न्यायालयातून किंवा रजिस्टर एजंट कडून घेतो. ते आता बँके तर्फे उपलब्ध करण्याचे विचार आहे. ते काम देशात फक्त दोनच बँकांना द्यायचे ठरले आहे सुदैवाने त्यात आमच्या बँकेला सुद्धा मिळण्याचे संकेत आहे. त्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आमच्या गव्हर्मेंट रिलेशन खात्यातल्या अधिकार्‍यांसोबत मिटींग होती. त्यात माझ्या बॉसला हि आमंत्रण आले होते. मिटींग नाशिकला होती. माझ्या बॉस ने स्पेशल परवानगी घेऊन मला हि येण्यास सांगितले. 

स्टॅम्प ड्युटी, स्टॅम्प पेपर, कोणते सेक्युरीटी मानदंड (security features) ठेवावे वगैरे  वर खूप सविस्तर चर्चा झाली. सुरक्षेच्या कारणास्तव मी ती इथे लिहू शकत नाही पण मला अगणित माहिती मिळाली. भ्रष्ट मंत्री असून हि आपले सरकार कसे चालते हा प्रश्न मला नेहमीचा पडायचा. ते ह्या मिटींग मध्ये समजले. खरच खूप शिकलेले,  देशाचा विचार करणारे, सरकार बरोबर सामान्य जनतेचा हि विचार करणारे खूप सारे अधिकारी इमानदारीने आपले काम पूर्ण करत असतात. खरच त्यांच्यामुळेच आपली अर्थव्यवस्था टिकून असते. अगदी तेलगी ने कसे घोटाळे केले? खोट्या नोटा कसे बनतात ? हे सुद्धा ह्या मिटींग मध्ये समजले. 

आमची मिटींग श्री चोखालिंगम ह्यांच्याबरोबर होती. श्री चोखालिंगम हे आयईएस अधिकारी आहेत. जे स्टॅम्प ड्युटी व रेवेन्यू खात्याचे उच्चतम अधिकारी आहेत. त्यांचे रिपोर्टिंग हे प्रत्यक्षपणे अर्थ खात्याला असते. त्यांच्या सारख्या एकदम उच्च अधिकाऱ्याशी भेटण्याचा योग आला. माझ्या बॉस च्या अनुभवानुसार सहसा आयपीएस अधिकारी हे अश्या छोट्या मोठ्या मिटींगला येत नाही आणि आले तर आपलेच बोलणे खरे करतात दुसऱ्याचे कधी ऐकतच नाही. पण श्री चोखलिंगम हे त्याला अपवाद होते. त्यांनी सर्वाशी ओळख तर करून घेतलीच पण सर्वांशी उत्तम रित्या संवाद हि साधला. त्यांची कल्पना काय आहे हे त्यांनी समजावून तर सांगितले पण त्याच्यावर आमचे विचार काय आहेत हे हि जाणून घेतले. खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण चर्चा झाली. एवढा मोठा अधिकारी पण त्याला जरासुद्धा गर्व नव्हता. 

दुसऱ्या एका अधिकाऱ्याबरोबर ओळख झाली ते म्हणजे श्री ताहिरी. हे "इंडिअन सेक्युरीटी प्रेस" चे जनरल मनेजर आहेत. "इंडिअन सेक्युरीटी प्रेस" (नाशिक प्रेस ) चे जनरल मनेजर पद भूषवणे म्हणजे खूप मोठे काम असते. जरा जरी चुकी झाली तर त्याचे परिणाम खूप भयंकर होऊ शकतात. नाशिक प्रेस मध्ये प्रवेश हा सहज सहजी मिळत नाही. आतमधल्या अधिकारीची ओळख आणि परवानगी शिवाय आत मध्ये प्रवेश मिळत नाही. इथल्या प्रवेशद्वारी साधी सेक्युरीटी नसते तर सरळ बंदुकधारी पोलीस आणि मिलिटरी असते. प्रवेश पास असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. श्री तहिरी ह्यांच्यामुळे आम्हाला प्रवेशच नाही तर नाशिक प्रेस हि जवळून बघायला मिळाली.

आपल्या पोस्टाची तिकिटे कशी बनतात? पासपोर्ट कसा बनतो? पासपोर्ट ची नक्कल बनू नये म्हणून काय काय सुरक्षेचे उपाय करतात? किती वेगवेगळी उघड्या डोळ्यांनी न दिसणारी सुरक्षित वैशिष्ट्ये/मानदंड  (Security features) टाकतात हे सगळे जवळून बघायला मिळाले. सरकारी चेक कसे छापतात ते सुद्धा जवळून बघायला मिळाले. इथे तयार झालेला माल हा रेल्वे स्टेशन वर जात नाही तर रेल्वे ह्या प्रेस मध्ये येते. इंग्रजांच्या काळातले रेल्वे मार्ग अजून हि इथे वापरात आहेत. आम्ही ज्या युनिट मध्ये जाऊ तेथे जनरल मनेजर चे पाहुणे म्हणून सर्व उठून उभे राहत होते. सर्व प्रक्रिया/ कामे आम्हाला आवर्जून दाखवत होते. एक गोष्ट चांगली वाटली कि ८० टक्के हून जास्त लोक मराठी आहेत आणि वाईट अश्यासाठी वाटले कि त्यांच्यावर असणारे २० टक्के सुपरवायझर हे अमराठी आहेत. पण सर्व मिळून मिसळून काम करतात अगदी साऊथ इंडिअन लोकही मराठीतून बोलतात. 

प्रेस एवढी मोठी आहे कि फिरायला कमीत कमी २/३ तास लागतील पण एक तर तशी परवानगी नसते आणि आमची मिटींग पण लगेच होती त्यामुळे आम्हाला आमची धावती भेट अर्ध्या तासात उरकायला लागली. मोठ-मोठ्या बँकेच्या चेअरमन ला हि  प्रेस सहजासहजी बघायला मिळत नाही ती नशिबाने मला आणि माझ्या बॉस ला बघायला मिळाली.

ह्याच प्रेस च्या दुसऱ्या युनिट मध्ये आपल्या नोटा छापतात. पण त्या युनिट मध्ये जायला एक तर अर्थ खात्याची किंवा आरबीआय (RBI) ची पूर्व परवानगी लागते ती प्रेस तर अजून बघायला नाही मिळाली आहे. बघूया तो योग नशिबात कधी येतोय.

अर्थातच कुठेही फोटो काढायला परवानगी नसल्याने कुठलेच फोटो ब्लॉग वर लावू शकत नाही.

Read More