चार दिवसापासून आमच्या नाक्यावर सचिन तेंडुलकरला वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करणारा एक मोठा बॅनर लावला होता. नशीब आमच्या राजकारणी लोकांना स्वतःचे बॅनर लावण्यापासून फुरसत मिळाली आणि नशीब क्रिकेटच्या देवाची आठवण झाली.
आपल्या सचिनचा आज वाढदिवस. देव करो आमच्या ह्या देवाला उदंड आयुष्य लाभो. महाभारतात एकदा पहिले होते. जेव्हा भीष्म युद्धापूर्वी दुर्योधनाला समजावत असतात की पांडवांबरोबर युद्ध करू नकोस साक्षात भगवंत (श्रीकृष्ण) त्यांच्या बाजूने आहे. मला नेहमी विचार पडायचा कि ह्यांना कसे समजत असेल की श्रीकृष्ण देवाचे रूप आहे. तीच गोष्ट श्रीरामाच्या बाबतीत होती. त्यावेळेची प्रजा, ऋषी हे रामाला भगवंताचे रूप मानायचे. मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा कि ते देवाला कसे ओळखत असतील? साक्षात देवा बरोबर राहायला त्यांना कसे वाटत असेल? देवाचे चमत्कार बघताना काय मनात येत असेल? पण जसजसा मोठा होत गेलो आणि सचिन ला बघत गेलो. त्याच्या बॅटीतुन घडणारे चमत्कार पहिले आणि माझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळत गेली.
ऍलन बॉर्डर ने जेव्हा गावस्करचा रेकोर्ड तोडला होता त्यावेळेला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता. मला वाटत नाही हा रेकोर्ड जास्त दिवस माझ्या नावावर राहील. सचिन तेंडूलकर सारखे बॅटसमन सध्या क्रिकेट खेळत आहेत.त्यावेळेला तर सचिन खूप लहान होता. नुकताच बहरत होता. अजून त्याने आपले रंग पण दाखवले नव्हते. तरी सुद्धा बोर्डरने त्याच्यातल्या देवाला ओळखले होते.
गेले वीस बावीस वर्षे तो खेळतो आहे. कधी कोणाबरोबर भांडणे नाहीत, झगडे नाहीत, स्लेजिंग नाही, पोंटिंग सारखे प्रेस कॉन्फेरन्स घेऊन दुसऱ्या टीमवर कधी कमेंट नाहीत, कोणी कितीही टीका करुदेत कधी कोणाला उलटी उत्तर नाहीत, जे काही सांगायचे आहे त्याने ते त्याच्या बॅटनेच सांगितले. पाकिस्तानच्या सेमी फायनल आधी सुद्धा त्याने नवीन बॅट घेतल्या होत्या तेव्हा तो कितीतरी तास लाकडाच्या हातोडीने बॅटला ठोकत बसला होता. फक्त बॅट चा स्ट्रोक वाढवण्यासाठी. ह्या वयात पण तो धावा मिळवण्यासाठी एवढा उत्सुक असतो जेवढा एखादा नवीन भरती झालेला खेळाडू असतो.
ग्रेट !! सिम्पली ग्रेट !!!
त्याच्याबद्दल लोक काय म्हणतात माहिती आहे?
" मला वाटते माझ्या मुलाने सचिन तेंडूलकर बनावे." ब्रायन लारा.
"आम्ही इंडियाच्या टीम बरोबर नाही हरलो. आम्ही फक्त सचिन तेंडुलकर नावाच्या माणसाबरोबर हरलो"-मार्क टेलर.
"तुमच्या बरोबर काहीही वाईट घडू शकत नाही जर तुम्ही भारतातील विमानात असाल आणि सचिन तेंडूलकर तुमच्या सोबत असेल." हाशिम आमला.
" तो चालताना वापरायच्या काठी ने सुद्धा चांगला लेग ग्लान्स खेळू शकतो."- वकार युनूस.
"..जगात फक्त दोन प्रकारचे फलंदाज आहेत. १. सचिन तेंडूलकर आणि २. इतर सर्व."- अँडी फ्लॉवर.
' मी देव पहिला आहे. तो टेस्ट मध्ये भारतासाठी चवथ्या नंबरवर फलंदाजी करतो." - मॅथ्यु हेडन.
"मी स्वत:ला बघतो जेव्हा मी सचिन ला फलंदाजी करताना बघतो."- सर डॉन ब्रॅडमन.
"जेव्हा सचिन फलंदाजी करत असतो तेव्हा तुम्ही तुमचे गुन्हे आरामात करू शकता, कारण देव सुद्धा सचिनची फलंदाजी बघण्यात व्यस्त असतो." - ब्रिटीश मिडिया.
" मला क्रिकेट बद्दल काही माहिती नाही पण मी सचिनला खेळताना बघतो. मला त्याचे क्रिकेट आवडते म्हणून नाही तर त्यावेळेला माझ्या देशाचे उत्पादन ५% ने कमी का होते ते जाणून घेण्यासाठी." बराक ओबामा.
" सचिन, आम्हा सगळ्यांना बनायला आवडेल असा माणूस." अँड्रयु सायम्ंडने त्याच्या टी शर्ट वर लिहिले होते. सचिनने हा टी-शर्ट स्वत: साईन केला होता.
"तुझे पता है तुने किसका कॅच छोडा है."- वासिम अक्रमने अब्दुल रज्जाकला सचिन चा झेल सोडल्यावर.
" सचिन प्रतिभाशाली आहे. मी नश्वर आहे." - ब्रायन लारा.
" मी त्याला जेव्हा जास्त बघतो तेव्हा जास्त भ्रमित होतो कि मी जे बघतोय ती सचिनची सर्वात चांगली खेळी आहे का?"....एम. एल. जैसिम्हा.- पूर्व क्रिकेटर.
" मी शंभर टक्के सांगू शकते की सचिन एक मिनिट पण नाही खेळणार जेव्हा तो स्वत: क्रिकेट एन्जॉय करणार नाही. तो अजून ही तेवढंच वेडा आणि उत्सुक आहे क्रिकेट खेळण्यासाठी." -अंजली तेंडूलकर.
" इंडियामे आप एक बार पंतप्रधान को कोर्ट के कटघरेमे खडा कर सकते हो, सचिन को नही." नवज्योत सिंग सिद्धू.
" त्याची विकेट घेण्यासाठी तयारी न केलेली बरी कारण तुम्हाला वाईट तरी नाही वाटणार जेव्हा तो तुमच्या उत्कृष्ट बॉल वर जेव्हा चौकार मारतो."- ऍलन डोनाल्ड.
" शिमला वरून दिल्लीला ट्रेन ने जाताना मध्ये एक स्टेशन लागते. गाडी तेथे फक्त दोन मिनिटे थांबते. पण गाडी जास्त वेळ थांबली कारण सचिन ९८ वर खेळत होता. सर्व प्रवासी, रेल्वे ऑफिसर, मोटरमन सर्व जण सचिनचे शतक बघायला थांबले होते. हा प्रतिभाशाली खेळाडू भारतात वेळेला पण थांबवू शकतो." ... पीटर रेबौक - ऑस्ट्रेलियाई पत्रकार.
"नशीब क्रिकेट त्यावेळेला प्राचीन युगामध्ये नव्हते. नाहीतर क्रिकेट हे देवाचे नाव झाले असते आणि सचिन त्याचा अकरावा अवतार झाला असता" - हरि पटनायक
"सचिन कधीच चीटींग करू शकत नाही. तो क्रिकेट साठी महात्मा आहे जे गांधीजी राजकारणासाठी होते."
एनकेपी साळवे, पूर्व केंद्रीय मंत्री जेव्हा सचिन वर बॉल कुरतडल्याचा आरोप केला गेला होता तेव्हा.
" माझ्या वडिलांचे नाव पण सचिन तेंडूलकर आहे" - सचिनची मुलगी सारा.
" जर क्रिकेट राम असेल तर सचिन हनुमान आहे. रामाचा सर्वात मोठा शिष्य." एम एस धोनी.
" तो स्वत:ला कधी रागावू देत नाही. मि त्याला अजून रागाने बॅट आपटताना बघितले नाही जरी त्याला चुकीचे आउट दिले असले तरी सुद्धा. त्याने एक बाउल आईस क्रीम जास्त खाल्ले कि समजायचे कि तो रागात आहे किंवा टेन्शन मध्ये आहे." झहीर खान.
"बच्चे ! एक दिन तू बहुत बडा बनेगा. लेकिन वो टाईम पे तेरे पहिले कप्तान को मत भूलना." के. श्रीकांत.
" ग्रेग चापेल गांगुली के जैसे सचिन से भी छुटकारा पाना चाहते थे. लेकिन उनकी योजना विफल रही." दिलीप वेंगसरकर.
" तो नेहमी जिम ला जातो कधीच चुकवत नाही." एक टीम प्लेयर.
" तू अश्या चुकीच्या बॉलला का आउट होतोस ?" - अंजली तेंडूलकर जेव्हा सचिन ऑफ साईड चा फटका मारताना आउट व्हायचा.
"असे माझ्या बरोबरच का झाले मला अजून क्रिकेट खेळायचे आहे?" सचिन स्वत: आपल्या बायकोला म्हणाला जेव्हा त्याला टेनिस एल्बो झाला होता आणि त्याला ऍडमिट केले होते.
अश्या ह्या ग्रेट माणसाबद्दल लिहायला बसलो तर पुढचा वाढदिवस येईल.
तुम जियो हजारो साल...साल के दिन हो पचास हजार.