Showing posts with label मराठी कथा. Show all posts
Showing posts with label मराठी कथा. Show all posts

एका रात्रीची गोष्ट...

तो नेहेमीप्रमाणे कामावरून घरी येत होता. आजही पाय लडखडत होते. चाळीच्या कॉर्नर पर्यंत मित्र सोडायला आला होता. आज पण नाही नाही म्हणता जास्त घेतली होती. आता तोंडाचा वास आला कि बायकोची कटकट चालू होईन. पोरांची रडारड चालू होईल. वैताग आलाय ह्या गरिबीचा, ह्या कामाचा, ह्या दररोजच्या कटकटीचा. तेच सारे विसरायला हे पिणे चालू झाले आणि आता सुटता सुटत नाही आहे. बायको पण समजून घेत नाही आहे. तिला वाटतेय कि मजा मारायला पितोय. मी कामावरच्या बायकांबरोबर बोललो तरी तिला संशय येतोय. माझ्यावर विश्वासच नाही. साला मला कोण समजूनच घेत नाही आहे. वैताग आलाय ह्या जगण्याचा.

धडपडत, कशाबशा पायऱ्या चढत तो चाळीतील आपल्या घरापर्यंत आला. दरवाजा ठोठावला. आतून 'बाबा आले' 'बाबा आले' असा पोरांचा आवाज आला. बायकोने दरवाजा उघडला. दारूचा भपकारा तिच्या नाकाला झोंबला तसा तिचा पारा चढला. धावत आलेल्या छोट्या पोराला तिने तसाच डोळे वर करून मागच्या मागे पिटाळला. कंबरेवर हात ठेवून तिने रागाने नवऱ्याला विचारले, "आलात आज पण पिऊन? तुम्हाला तर काही सांगून समजतच नाही इथे पोरांना शाळेत फी भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही खुशाल आपले ढोसून येताहेत. बायकोचे काही ऐकायचे नाही असेच ठरवले आहे वाटते?"

मोठी मुलगी पुढे आली आणि आईला म्हणाली, "अगं आई त्यांना आत तर येउदे."
"तू गप् ग !आली मोठी मला शिकवायला"...आई कडाडली.
तशी पोरगी गप् जाऊन पुस्तकात डोके घालून बसली. 

तो आत आला तसा उंबरठ्याला अडखळून धडपडला. एवढी घेतली होती कि बायकोने कपाळाला हात मारून दोन शिव्या घातल्या. बायकोने आणि मुलीने तसाच खांद्याला धरून वर उठवला आणि आतल्या झोपायच्या खोलीत  नेऊन झोपवला. 

सकाळी डोळ्यावर सूर्याची किरणे आली तशी त्याला जाग आली. घड्याळात बघितले साडे आठ वाजून गेले होते. आज पण बायकोने उठवले  नाही. आज पण कामाला लेट होणार. परत सायेबाच्या शिव्या खाव्या लागणार. उठून बेड वर बसला. डोके अजून जड होते.सर्व गरगरत होते. आता बायकोची कटकट चालू झाली कि अजून डोके उठणार आहे. पण आज बायकोचा आवाज येत नव्हता  तो तसाच डोके पकडून उठला. तेवढ्यात बायको समोर आली. चक्क हातात लिंबू पाणी घेऊन आणि म्हणाली, "हे घ्या ! जरा डोके हलके वाटेल". 

च्यामायला मी स्वप्नात तर नाही ना ? बायकोचा आवाज एवढा मृदू कसा झाला? लग्नानंतर पहिले काही दिवसच हा आवाज ऐकायला मिळाला होता. स्वत:लाच चिमटा काढून त्याने खात्री करून घेतली. पण जे डोळ्यासमोर होते ते खरे होते. हातात खरच लीम्बुपानी चा ग्लास होता. एका घोटात त्याने पिऊन टाकला आणि अंघोळीसाठी बाथरूम मध्ये गेला.

डोके पुसत बाहेर आला तर बेड वर त्याचे ऑफिस ला जायचे कपडे काढून ठेवले होते. शूज पोलिश करून ठेवले होते. तेव्हढ्यात बायको आली तिने हातातला टॉवेल खेचून घेतला आणि म्हणाली तुम्ही बसा खुर्ची वर मी पुसते तुमचे केस. तो आश्चर्यचकित !!!! बसला खुर्चीवर. 

डोके पुसता पुसता बायको म्हणाली,"लवकर तयारी करून या. आज नाश्त्याला तुमच्यासाठी कांदा पोहे केले आहेत. ते खावून घ्या आणि डब्याला पण तुमच्या आवडीचीच भाजी केली आहे आणि संध्याकाळी पण लवकर घरी या" टॉवेल त्याच्या हातात देऊन ती स्वयंपाक घरात निघून गेली.

आत तर तो पूर्ण चक्रावून गेला. रात्री असे काय झाले तो ते आठवायचा प्रयत्न करू लागला. पण रात्री एवढी चढली होती कि काही आठवायलाच तयार नव्हते. एवढेच आठवले कि आपल्याला बायकोने आणि पोरीने उचलून आतल्या खोलीत उचलून आणले. तो पोरीकडे गेला आणि विचारले, "काय ग !! तुझ्या आई ला मध्येच काय झाले? एका रात्रीत अशी अचानक कशी बदलली?"

पोरगी म्हणाली, "बाबा ! काल आम्ही तुम्हाला बेड वर नेऊन टाकले. मी तुमचे शूज काढत होती आणि आई तुमचे ऑफिसचे कपडे काढत होती, तेव्हढ्यात तुम्ही ओरडला कि नको नको बाई ! माझे कपडे काढू नका. माझे लग्न झालेले आहे. माझी घरी एक बायको आहे. दोन मुले आहेत. प्लीज माझे कपडे काढू नका. प्लीज......"

तो काय समजायचे ते समजून गेला.

Read More