Wednesday, March 16, 2011
Jaitapur Power Plant / जैतापूर अणु प्रकल्प
खूप दिवस झाले जैतापूर अणु प्रकल्पावर चर्चा झडताहेत. वर्तमानपत्रात रकाने भरून येताहेत. राजकीय नेते एकमेकांना खुले आव्हान करताहेत. ब्लॉग्ज लिहिले जाताहेत. खूप मोठी मोठी माणसे, समाजसेवक, शास्त्रज्ञ पुढे येऊन प्रतिक्रिया देताहेत. त्यात जपान मध्ये झालेला भूकंप आणि त्सुनामी ह्याने तर अजून भर टाकली. सर्व वाचन करून आणि अभ्यास करून सुद्धा मला काही गोष्टी खटकल्या. मी कोकणी असल्यामुळे आणि कोकणावर खूप प्रेम असल्यामुळे मलाही काही गोष्टी प्रकर्षाने मांडाव्याशा वाटताहेत.
१. कोकण तसा म्हटला तर निसर्गाने समृद्ध असा प्रदेश आहे. पठारावर असणारा रखरखीतपणा येथे कमी आहे. कोकणी माणसाचे मुख्य उत्पन्न हे भात, आंबा आणि काजू आहे. बाकी येणारे उत्पन्न हे विकण्यापेक्षा खाण्यातच जास्त जाते. गेल्या काही वर्षापासून हापूस आंब्याला मिळालेली मागणी मुळे कोकणातल्या जमिनादाराना उत्पन्नाचे स्त्रोत मिळाले आहे.
२. कोकणाला म्हणावे तसे कुशल नेतृत्व मिळालेच नाही. एक दोघे नेते सोडले तर कोकणाला दारिद्र्यातून बाहेर काढून विकासाची दिशा दाखवणारे कोणी भेटलेच नाही. निसर्गाचा वरदहस्त असूनही हा प्रदेश गरीबच राहिला आहे कारण चांगली दिशा दाखवणारा कोणी चांगला मार्गदर्शकच नाही मिळाला आहे. आज हि कोकणातली गावे एवढी मागासलेली आहे जेथे जायला पक्के रस्ते नाहीत. गावात दिवसभरात फक्त एकच एसटी येते. लोड शेडींग तर विचारू नका. अजूनही माझ्या गावात १० ते १२ तास लोडशेडिंग होते. गावात दोन पदरी रस्ते नाहीत. स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष झाली पण कुठल्याही अर्थसंकल्पात कोकणासाठी कधीच पकेज जाहीर केली गेली नाही. उलट महाराष्ट्रातील इतर प्रदेश साखर कारखान्याने समृद्ध झाले आहेत. कोकणाच्या हाती कोय आणि बाटाच आला आहे.
३. आज हि कोकणातील शेतीला आणि प्यायला होणारा पाणी पुरवठा पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून आहे. माझ्या गावात तर अजूनहि विहिरीचेच पाणी वापरले जाते. नळाचे पाणी तर अजून आलेच नाही. माझे गाव एवढे पण मागासलेले नाही आहे जिथे दुर्लक्ष होऊ शकते. सिंधुदुर्गातले महत्वाचे गाव आहे तरी सुद्धा पाण्याची डायरेक्ट लाईन घरापर्यंत आली नाही आहे. उतरता प्रदेश असल्याने सर्व पाणी ओहोळातून समुद्रात वाहून जाते. एखादी वर्षी पाउस पडला नाही तर कोकणी माणसाचे हाल होतात. अशा कोकणाकडे लक्ष द्यायला कधी कुठल्या राजकारणी माणसाला वेळ नाही भेटला. अचानक जैतापूर प्रकल्प टाकायला कशी आठवण झाली??? नवीन काही प्रयत्न ट्रायल बेसिस वर करायचे असतील आणि त्यात धोका असेल तर कोंकण नेहमीच ह्यांना दिसतो. एनरॉनच्या बाबतीत हे हेच झाले होते. माझा तर कुठल्याच राजकारणी नेत्यावर विश्वास राहिला नाही आहे. आज बोम्बलणारा नेता रात्री पेटी पोचली कि दुसऱ्या दिवशी एकदम शांत होतो आणि त्याच गोष्टीचे गुणगान गायला लागतो. एनरॉन त्याचा ढळढळीत पुरावा आहे.
४. काही लेखांमध्ये मी वाचले कि जैतापूर हा सेस्मिक झोन ३ मध्ये येतो आणि महाराष्ट्राला पर्यायाने जैतापूरला भूकंपाचा धोका खूप कमी आहे कारण हा पूर्ण ज्वालामुखी पासून बनलेला प्रदेश आहे. तसे जर असेल तर कोयना धरणाला का भूकंपाचे धक्के बसतात? आणि कोकण पेक्षा पठार आणि घाटमाथा जास्त सुरक्षित आहे. मग हा प्रकल्प तेथे का नाही होत आहे? जेव्हा काही चांगले प्रकल्प चालू करायचे असतात तेव्हा बारामती, लातूर, नांदेड अशा ठिकाणी आपले राजकारणी धावतात, अशा धोकादायक प्रकल्पाला ते आपल्या जिल्ह्यात कसे आणतील ? निदान ह्या प्रदेशातील लोकांना इतर उत्पनाचे साधने तरी आहेत कोकणात शेती,आंबा आणि काजू शिवाय काय आहे? जर प्रकल्पामुळे काही धोका झाला तर कोकणात काहीच उत्पन्नाचे साधन राहणार नाही.
५. काही विचारवंत लिहिताहेत कि जैतापूर प्रकल्पाला लागणारी जमीन हि पडीक जमिनीतून वापरली जाणार आहे. त्यामुळे कोकणातील भात शेतीवर काही परिणाम होणार नाही? अशा पडीक जमिनी महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात हि आहेत कि ? कोकणातील जमीनच का ? कोकणातील पडीक जमिनी मध्ये किंवा काळा कातळ असलेली जमिनी मध्ये आजकाल आंब्याच्या कलमाची लागवड होऊ शकते. कुठलीच जमीन अशी पडीक म्हणून घोषित करता येणार नाही.
६. काही विचारवंत लिहिताहेत कि प्रकल्पाचे पाणी दूरवर (म्हणजे ५ किमी ?) सोडले जाईल ? समुद्रात पाच किमी वर टाकलेली एखादी वस्तू हि भरतीच्या वेळेला आरामात किनाऱ्यावर येते त्यात दुषित पाणी आणि पदार्थ बद्दल काय सांगायचे? माझे म्हणणे आहे जर आले तर काय करणार ? मासेमारी वर जगणारे लोकांना दुसरे उत्पन्न काय राहील? सरकार ने हा विचार केला आहे का? इंद्रायणी काठी होणारा डाऊ प्रकल्प त्याच कारणामुळे होऊ दिला गेला नाही. असे असते तर आपले मुंबईतले नाले का नाही लांब समुद्रात सोडत जेणेकरून ज्या काही चौपाटी उरल्या आहेत त्या तरी स्वच्छ राहतील.
७. चेनोर्बील चा अपघात हा मनुष्य चुकी मुळे घडला आणि त्याची तुलना जैतापूर शी नको असे वारंवार सांगितले जाते? मनुष्य चुका होणार नाही ह्याची गॅरेंटी कोणी घेत आहे का? का नाही एखादाच्या हातून हि चुकी होऊ शकत? तशी ती चुकी दुसऱ्या जागी सुद्धा होऊ शकते पण तेथे दुसरे उत्पन्नाचे साधन उपलब्ध असेल.
८. जरी पुढे मागे हा प्रकल्प झाला तरी भूमिहीन झालेल्यांना योग्य तो मोबदला मिळेल ह्याची काय गॅरेंटी? अजून कोयना प्रकल्पाचे, नर्मदा प्रकल्पाचे भू-मालकांना त्यांचे हिशोब चुकते व्हायचे बाकी आहेत.
९. जपान मधला भूकंप आणि त्सुनामी कडे बघून तरी आपण थोडे शिकलो पाहिजे. समुद्राकाठीच परत अणुप्रकल्प उभारण्याची एवढी खाज का असावी? भूगर्भ शास्त्रज्ञांचा हवाला देऊन इथे भूकंप होणाच्या शक्यता कमी आहेत असे सांगितले जाते. आताच मटा मध्ये वाचले कि गेल्या २० वर्षात इथे ९२ भूकंप झाले आहेत आणि त्यात जास्तीत जास्त ६.२ स्केल चा आहे. आता प्रकल्प वाल्यांना हा कमी वाटतो आहे का? मटा मध्ये आलेला परिच्छेद तसाच इथे देतो....
जैतापूरला २० वर्षांत ९२ धक्केजैतापूर हे भूकंपप्रवण क्षेत्रात झोन ३ या विभागात येते. जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या नोंदणीत १९८५ ते २००५ या कालावधीत जैतापूरमध्ये ९२ भूकंप झाल्याची नोंद आहे. या पैकी सगळ्यात मोठा भूकंप ६.२ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. जैतापूरचा हा भूभाग अस्थिर असून मोठा भूकंप झाल्यास सरकारच्या आपत्ती निवारण यंत्रणा अशा किरणोत्साराच्या आपत्तीपासून कोंकण विभागाला वाचवण्यास कुचकामी ठरतील असे भूवैज्ञानीक आणि प्रकल्प विरोधक कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.
१०. समजा गृहीत धरू कि जमीन चांगली आहे, भूकंप विरोधी आहे. पण जर असा भूकंप समुद्रात झाला आणि त्सुनामीच्या प्रचंड लाटा आल्या तर प्रकल्पाला धक्का पोहचू शकत नाही का? संपूर्ण कोकण त्या चपेट मध्ये येऊ शकतो.
१०. फुकुशिमा अणुभट्टीत पहिला स्फोट झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, आज चौथ्या भट्टी ला आग लागली. जपान सारखा प्रगत देश जेव्हा नैसर्गिक आपत्तीत सापडतो तेव्हा आपल्या अणु भट्ट्या वाचवू शकत नाही तर आपल्या सारख्या देशाचे काय? अगदीच नाही तर कोकणात जायला रस्ते तरी पाहिजेत. नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा प्रगत देशांचे काहीच चालत नाही तिथे आपली काय कथा?? असे प्रकल्प भूकंपप्रवण क्षेत्रात आणूच नये
११. जैतापुरचे भौगोलिक स्थान जर गुगल नकाशात बघितले तर ते समुद्रात किती जवळ आहे ते समजेल. त्सुनामी सारख्या लाटा जर आल्या तर त्यावर किती परिणाम होऊ शकतो ते बघा.
१२. पाकिस्तान ने आपले रंग आधीच दाखवले आहेत. उद्या जर त्यांनी लांबच्या मार्गाने येऊन जैतापूर जवळ काही सागरी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आपण तो परतवू शकतो का? मी म्हणतो ते जरा अतिशयोक्तीच वाटेल पण आपले तटरक्षक दल आणि नौदल किती सक्षम आहे ते आपण मुंबई च्या २६/११ ला झालेल्या हल्ल्यात आणि १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटात कोकणात उतरवलेल्या आरडीएक्स च्या वेळेला बघितले आहे. जैतापूर आल्यावर त्यांना जास्त काही करायची गरजच नाही पडणार. तुम्ही म्हणाल जपान सारख्या छोट्या देशाचे सर्व अणु प्लांट सागरी किनारी आहे. पण जपान हे बेटच आहे त्याला दुसरा पर्यायच नाही....पण आपल्याला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जपान ला पाकिस्तान सारखे क्षत्रू नाहीत आणि आपल्या सारखा आतंकवाद नाही. त्यामुळे एवढ्याश्या देशातहि खूप अणु प्लांट आहेत.
(चित्रावर टिचकी मारून मोठे करू शकता)
"....Union Environment and Forests Minister Jairam Ramesh meanwhile said the nuclear crisis in Japan is a wake-up call for India and everyone else, adding additional safety measures would be specified for the Jaitapur nuclear power project...."
Read more: http://www.zeenews.com/news693597.html#ixzz1GmSNsqWk
१४. जर्मनीची कॉमार्झबँक (Germany’s Commerzbank ) हिने सुद्धा ह्या प्रोजेक्ट मधून अंग काढून घेतले आहे. कारण काय तर? "sustainability and reputational risk" म्हणजेच स्थिरता आणि आणि प्रतिष्ठेच्या भीती मुळे.
अणुशक्तीची गरज भारताला आहे आणि त्याचे महत्व मी नाकारत नाही पण सुपीक जमिनी अशा प्रकल्पाखाली घालून नापीक जमिनीवर शेतीचे प्रयोग करण्यात काय अर्थ आहे. त्यापेक्षा जेथे मनुष्यवस्ती कमी आहे, नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी आहे, निसर्गाला इजा पोहोचणार नाही अशा ठिकाणी आपण का नाही करू शकत. जाणूनबुजून धोंडा आपल्याच पायावर का मारून घ्यायचा? महाराष्ट्राला लोड शेडींग मधून बाहेर पडण्याची खूप गरज आहे आणि असे अणुप्रकल्प खरच खूप उपयोगी येतील पण कोकण तरी त्यासाठी नाही आहे.
6 comments:
namaste lekh aawadla. mahitipurn ahe. mala tumchyashi sampark karaycha ahe. email / mobile kalawinyachi krupa kara.
March 17, 2011 at 6:01 PM......siddharam patil, 9325306283
मुंबईच्या मध्यावर कित्येक वर्षांपासून संशोधन-अणुभट्ट्या काम करीत आहेत. जैतापूर अणुभट्टीचा आराखडा येथेच तपासला गेला. तामिळनाडूमधील कल्पक्कम् अणुवीज केंद्रावर त्सुनामी आदळली होती याची नोंद आपण घेतलीच असेल.
March 17, 2011 at 10:09 PMवीज आम्हाला नकोच अशी भूमिका घेऊन कोकणवासीयानी जैतापूर विरुद्ध आंदोलन करावे. आणि हो कोकणातील जमिनी पडीक नसतील तर कोकणाला मनिऑर्डरची एवढी गरज का आहे.
धन्यवाद हा लेख लिहिल्या बद्दल मला ह्या प्रकल्पा बद्दल माहिती नव्ह्यते, पण वाचून वाटते कि आपल्याला उर्जेची गरज तर आहे पण कोकणच का ? त्या साठी. या मागे नक्की काही तरी राजकारण असणार. पण दुःख यीतकेच कि यामध्ये मरणार तो फक्त " कोकणी माणूसच", या बद्दल कोणत्या तरी राजकारणी पक्षाने खास करून मनसेने ( राज ठाकरेने ) आवाज उठवला पाहिजे.
March 18, 2011 at 11:08 PMधन्यवाद सिद्धाराम, आताच तुझ्या मेल वर रिप्लाय केला आहे. तुला जी माहिती पाहिजे आहे ती दिली आहे. तुझी तब्येत कशी आहे आता? आजारातून पूर्ण ठीक झालास का ?
March 19, 2011 at 7:29 PMशरयू धन्यवाद, ब्लॉगला भेट देऊन कमेंट दिल्याबद्दल. खूप रागावल्या आहात वाटतेय.
March 19, 2011 at 7:44 PM>>>मुंबईच्या मध्यावर कित्येक वर्षांपासून संशोधन-अणुभट्ट्या काम करीत आहेत. जैतापूर अणुभट्टीचा आराखडा येथेच तपासला गेला.
तुमचे म्हणणे बरोबर आहे. मुंबईत कित्येक वर्षापासून अणुभट्टी आहे पण ती किती धोक्यावर आहे हे तुम्हाला हि माहित असेल. हेडलीकडे अणुभट्टी चे नकाशे सुद्धा सापडले होते जेवढा धोका समुद्रकिनारी किंवा मोठ्या शहरात असतो तेवढा दुसरीकडे कमी असतो.
>>>>> तामिळनाडूमधील कल्पक्कम् अणुवीज केंद्रावर त्सुनामी आदळली होती याची नोंद आपण घेतलीच असेल.
त्यात आपले नशीब होते. नाहीतर आज आपली हालत जपान सारखी झाली असती.
>>>>> वीज आम्हाला नकोच अशी भूमिका घेऊन कोकणवासीयानी जैतापूर विरुद्ध आंदोलन करावे. आणि हो कोकणातील जमिनी पडीक नसतील तर कोकणाला मनिऑर्डरची एवढी गरज का आहे
वीज फक्त कोकणालाच नकोय तर पूर्ण राज्याला हवी आहे. आधी म्हटल्या प्रमाणे कोकणात पडीक जमीनी नाही पण तेथील शेती पूर्णपणे निसर्गावरच अवलंबून असते. हार्डली १०% शेतकरी वर्षाला दोन पिके घेत असतील. म्हणूनच कोकणाला अजूनही मनीऑर्डर ची गरज पडते.
श्रीकांत धन्यवाद कमेंट बद्दल,
March 19, 2011 at 7:46 PMह्यात राजकारण नकोच आहे. बहुतेक मनसेने पण ह्याला सपोर्ट केला आहे.
Post a Comment